टँकरवाल्यांनाच काळजी
By Admin | Updated: March 17, 2015 00:48 IST2015-03-17T00:11:49+5:302015-03-17T00:48:14+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड गावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे

टँकरवाल्यांनाच काळजी
व्यंकटेश वैष्णव , बीड
गावातील पाणी टंचाईची काळजी त्या-त्या गावातील ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांनाच जास्त असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. टँकर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून ग्रामस्थांना पुढे करून टँकर सुरू करण्यासाठी मागणी लावून धरण्याचा आग्रह केला जात आहे. यासाठी तहसीलदारांवर देखील दबाव आणला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
तीन वर्षापासून अत्यल्प पाऊस पडलेला असल्याने निश्चितच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर लाखो रूपये खर्च केलेले आहेत. अशा गावांमधून देखील टँकरची मागणी ग्रामस्थांपेक्षा ठेकेदारांचे बगलबच्चे करताना पहावयास मिळत आहे.
टँकर मागणीचे आकडे लागले फुगू
प्रत्येक तालुक्यांतील टँकरचे आकडे फुगू लागले आहेत. मागील अडीच महिन्यापूर्वी टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे होते. तेव्हा जिल्ह्यात १० च्या जवळपास टँकरची संख्या होती. हीच संख्या आता १३५ वर गेली आहे.
शिरूरमध्ये खाजगी टँकरला प्राधान्य
शिरूर कासार तालुक्यात आजस्थितीत ५ टँकर सुरू आहे. विशेष म्हणजे येथील या तालुक्यात एकही शासकीय टँकर लावण्यात आलेले नाही. केवळ खाजगी टँकरलाच या तालुक्यात प्राधान्य दिले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.