न्यायवैद्यकच्या अहवालानंतरच आगीचे गूढ उकलणार
By Admin | Updated: October 28, 2014 01:02 IST2014-10-28T00:47:30+5:302014-10-28T01:02:23+5:30
औरंगाबाद : स्वच्छतागृहाजवळ पुरेशी मोकळी जागा राहत असल्याने या ठिकाणी कोणी धूम्रपान अथवा शेगडीचा वापर करीत होते का? ब्रेक लायनरस, बोगीच्या चाकांतून पडणाऱ्या

न्यायवैद्यकच्या अहवालानंतरच आगीचे गूढ उकलणार
औरंगाबाद : स्वच्छतागृहाजवळ पुरेशी मोकळी जागा राहत असल्याने या ठिकाणी कोणी धूम्रपान अथवा शेगडीचा वापर करीत होते का? ब्रेक लायनरस, बोगीच्या चाकांतून पडणाऱ्या ठिणग्या आणि बोगीतील कचरा अथवा तात्काळ पेट घेणारा ज्वालाग्राही पदार्थ, या घटनेमागे कारणीभूत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आगीच्या घटनेनंतर विविध अंदाज वर्तविण्यात येत असले तरी अंतिम कारण अद्याप स्पष्ट होत नसल्याचे दिसत आहे. घटनेनंतर फॉरेन्सिकच्या पथकाने बोगीतून विविध नमुने गोळा केले आहेत. यामुळे आता या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर आगीचे कारण स्पष्ट होणार आहे. आग कशामुळे लागली हे फॉरेन्सिकच्या अहवालानंतर समोर येईल, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आय.बी.च्या पथकानेही घटनेची माहिती घेतली.
बोगीचे नमुने पुणे प्रयोगशाळेत
नांदेड-मनमाड पॅसेंजर गाडीच्या जळालेल्या बोगीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़ या प्रकरणाची रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे़
नांदेड-मनमाड पॅसेंजर गाडीला आग लागून बोगी खाक झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी घडली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक पी़सी़शर्मा यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले़
विभागाचे सुरक्षा अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करीत आहेत़ येत्या आठ दिवसांत चौकशी समिती आपला अहवाल विभागीय व्यवस्थापकाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती हाती आली आहे़ तसेच बोगीमध्ये आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल पाच दिवसांत येण्याची शक्यता आहे़
दरम्यान, विभागीय उपव्यवस्थापक निनावे यांनी सोमवारी नांदेडच्या श्री हुजूर साहिब रेल्वे स्टेशनला भेट देऊन येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली़
या घटनेसंबंधी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी आणि चौकशी समितीला अधिक माहिती देण्यासाठी सदर रेल्वेचे गार्ड बी. अमितकुमार, पॉइंटस्मन मिलिंद जयवंत, ट्रॅफिक इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत जाखडे, स्टेशन मॅनेजर डी.पी. मीना नांदेडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु सदर अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. सदर घटनेप्रकरणी आपण नांदेडला असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एम.एम. बांगी यांनी सांगितले.