दलित वस्तीतील फक्त ४० कामे पूर्ण
By Admin | Updated: July 3, 2014 00:24 IST2014-07-02T23:55:17+5:302014-07-03T00:24:06+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या १४ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीतून २०४ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ४० कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.

दलित वस्तीतील फक्त ४० कामे पूर्ण
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या १४ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीतून २०४ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी केवळ ४० कामेच आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.
जिल्हा परिषदेला दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत चालू वर्षी व गतवर्षीचा एक हफ्ता असे एकूण १४ कोटी २७ लाख रुपये उपलब्ध झाले. यामधून २०४ कामे मंजूर करण्यात आली. या कामांसाठीचा निधी डिसेंबरमध्येच ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला. असे असले तरी मंजूर केलेली कामे अत्यंत मंदगतीने केकली जात आहेत. गेल्या ७ महिन्यांत केवळ ४० कामेच पूर्ण करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे दलित वस्ती अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. या कामांची तपासणी करण्याचे औचित्यही जिल्हा परिषदेकडून दाखविण्यात आलेले नाही. या निधीतंर्गत बसविण्यात आलेले सौरदिवे आता काही गावांमधून गायब झाले आहेत. तर काही ठिकाणचे सौरदिवे बंद पडले आहेत. हलक्या दर्जाचे हे सौरदिवे बसविण्यात आल्याने त्याचा ग्रामस्थांना फारसा लाभ झाला नाही. काही जिल्हा परिषद सदस्यांनी यामध्ये चांगलेच उखळ पांढरे करून घेतले. अधिकाऱ्यांनीही याला पुरेपूर साथ दिल्याची चर्चा जि.प. वर्तुळातून ऐकावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेत सध्या काम पूर्ण झालेल्या ४० गावांमधील सरपंच व पदाधिकारी जि.प.कडे शिल्लक राहिलेल्या १० टक्के निधीची मागणी करीत आहेत. हा निधी देत असताना जि.प.तील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याची पदाधिकारी तक्रार करीत आहेत. दुसरीकडे करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाकडे मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे होत असलेल्या व झालेल्या कामांमध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगणमत केले आहे की काय? असाच सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)