८५ पैकी केवळ ४ स्कूल बसची तपासणी
By Admin | Updated: May 17, 2016 00:09 IST2016-05-17T00:07:03+5:302016-05-17T00:09:47+5:30
परभणी : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेर तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी काढले आहेत़

८५ पैकी केवळ ४ स्कूल बसची तपासणी
परभणी : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेर तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी काढले आहेत़ त्यानुसार मे महिन्यात ही तपासणी करणे बंधनकारक आहे़ परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत ८५ स्कूल बसपैकी केवळ ४ स्कूल बसेसची तपासणी १६ मेपर्यंत करण्यात आली आहे़ उर्वरित ८१ बसेसची तपासणी अजूनही बाकी आहे़
न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्याच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्कूल बसची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे़ १ मे ते ३१ मे या कालावधीत ही तपासणी होणे बंधनकारक आहे़ परभणी जिल्ह्यात नोंदणीकृत स्कूल बसची संख्या ८५ असून, या वाहनांच्या तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार आहे़ यात दिलेल्या निकषानुसार वाहनाचा रंग, वाहनावर स्कूलबस असे नाव नोंदविणे, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, बसच्या वाहनाचे वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, अपतकालीन दरवाजा, चालकास आपतकालीन परिस्थितीची माहिती होण्याकरीता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार आहे़ येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ५ मे रोजी प्रसिद्धी पत्रकही देण्यात आले होते़ परंतु, अद्यापपर्यंत स्कूल बसचालकांचा या तपासणीला प्रतिसाद मिळाला नाही़