११ महिन्यांत फक्त २१ विहिरींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:06 IST2017-08-06T00:06:32+5:302017-08-06T00:06:32+5:30
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

११ महिन्यांत फक्त २१ विहिरींची कामे
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात सतत तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी विहिरींचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येत होते. परंतु, या योजनेअंतर्गत अनेक कामे ठप्प पडली होती. त्यामुळे तीन वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे अशी परिस्थिती शेतकºयांवर पुन्हा उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौच खड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटिका, नंदन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा या योजनेत समावेश केला. हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या योजनेत जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले आहे.
जिल्ह्याला अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत २०१६ ते २०१८ या दोन वर्षांसाठी ४५०० सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरात ग्रामसभेतून ४ हजार ३४ लाभार्थी निवडले गेले. परंतु, यापैकी केवळ ७११ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी केवळ १४० कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ११ महिन्यात केवळ २१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष शेतकºयांना या योजनेचा फायदा मिळेनासा झाला आहे.