केवळ २१ प्रकल्प ‘फुल्ल’
By Admin | Updated: September 23, 2014 01:35 IST2014-09-23T00:43:20+5:302014-09-23T01:35:33+5:30
उस्मानाबाद : यंदा वरूणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने सद्यस्थितीत केवळ २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर १० प्रकल्पातील पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर गेली आहे़

केवळ २१ प्रकल्प ‘फुल्ल’
उस्मानाबाद : यंदा वरूणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने सद्यस्थितीत केवळ २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर १० प्रकल्पातील पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर गेली आहे़ २४ प्रकल्प कोरडेठाक असून, ६३ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे़ गणेशोत्सव कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्हा टँकरमुक्त झाला आहे़ दरम्यान, असे असले तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. यामुळे उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सलग तीन वर्षाचा दुष्काळ आणि गतवर्षी अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील टँकरच्या संख्येने शंभरी गाठली होती़ तर ३०० पेक्षा अधिक विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या़ तर चालू वर्षी पावसानेही अडीच महिने उशिराने जिल्ह्यात हजेरी लावली़ त्यामुळे जुलै महिन्यात टँकरची संख्या शंभरावर तर अधिग्रहण तीनशेवर गेले होते. आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाऊस झाल्याने टँकर व अधिग्रहणांची संख्या कमी झाली होती. सप्टेंबर महिन्यात चालु असलेले पाणी टँकर व अधिग्रहण पाणी टंचाई नसल्याने प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एक मोठा, सतरा मध्यम तर १९३ लघु व साठवण तलाव आहेत. जिल्ह्यातील एकमेव मोठा असलेल्या सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्प आहेत़ यातील एक मध्यम आणि २० लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ एका मोठ्या व ९ लहान प्रकल्पातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर आहे़ १६ प्रकल्पातील पाणीपातळी ५१ टक्के ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान आहे़ यात दोन मध्यम आणि १४ प्रकल्पांचा समावेश आहे़ तर २३ प्रकल्पातील पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा कमी असून, यात दोन मध्यम आणि ४७ लघू प्रकल्पांचा समावेश आहे़ तर तब्बल ६३ प्रकल्पाची पाणीपातळी अद्यापही जोत्याखाली असून, एक मध्यम व २३ लघू असे २४ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ (प्रतिनिधी)