कापसाची आवक केवळ १२ टक्केच

By Admin | Updated: November 10, 2014 23:58 IST2014-11-10T23:26:42+5:302014-11-10T23:58:42+5:30

पुरुषोत्तम करवा , माजलगाव गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.

Only 12 percent of cotton arrival | कापसाची आवक केवळ १२ टक्केच

कापसाची आवक केवळ १२ टक्केच


पुरुषोत्तम करवा , माजलगाव
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक खूपच कमी झाली असून, केवळ १२ टक्केच खरेदी झाली आहे. तर सोयाबीनची ४२ टक्के खरेदी माजलगाव कृउबा समितीने केली आहे.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने पेरण्या होतील की नाही? असे वाटत असतानाच थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसाने पेरण्या झाल्या. मुगाची तर यावर्षी पेरणीच होऊ शकली नाही. तर सोयाबीन, कापूस, बाजरी याचा पेरा झाला तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पेरण्या झालेल्या असल्या तरी आॅगस्ट महिन्यानंतर पाऊसच पडला नसल्यामुळे बहरात आलेली पिके वाळू लागली.
माजलगाव तालुक्यात सोयाबीन व कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला होता. परंतु वेळेवर पेरण्या न झाल्याने व पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. तसेच शेतकऱ्यांसमोर पिकांवर केलेला खर्च काढायचा कसा? असा प्रश्नही पडला होता. मात्र हा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याचे दिसून येत आहे.
माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी करण्यात आलेला कापूस व सोयाबीन या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. गतवर्षी ९ नोव्हेंबरपर्यंत ३८ हजार ४२२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यातून शेतकऱ्यांना १६ कोटी ७० लाख रुपये तर सोयाबीनची ४७ हजार ८०६ क्विंटल खरेदी करण्यात आली होती. यामधून १४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनची ४२ टक्केच खरेदी झाली. २० हजार २७० क्विंटल खरेदी झाली असून, ६ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर कापसाची १२ टक्के खरेदी झाली. ४ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी केला असून, त्यातून १ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
गतवर्षी कापसाला ४३५० रु. प्रती क्विंटल भाव होता. तर यावर्षी ४०८० रुपये एवढा भाव दिला जात आहे. तर सोयाबीनला गतवर्षीच्या सरासरीत भाव मिळत आहे. पिकावर केलेल्या खर्चाच्या तुलनेत यावर्षीचा भाव खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोंढ्यामध्ये सोयाबीन व कापसाची आवक खूपच कमी आहे. यापुढे सुद्धा आवक वाढली नाही तर याचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बसू शकतो.
भाव वाढवून देण्याची मागणी
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला ३०० ते ४०० रुपये कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. हा भाव वाढवून देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Only 12 percent of cotton arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.