ऑनलाईन साहित्य संमेलन अशक्य; छोटेखानी सोहळा होणार
By | Updated: November 27, 2020 04:01 IST2020-11-27T04:01:29+5:302020-11-27T04:01:29+5:30
सर्वकाही सुरळीत असते तर जानेवारी २०२१ मध्ये ९४ वे साहित्य संमेलन होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे आता साहित्य संमेलनाच्या ...

ऑनलाईन साहित्य संमेलन अशक्य; छोटेखानी सोहळा होणार
सर्वकाही सुरळीत असते तर जानेवारी २०२१ मध्ये ९४ वे साहित्य संमेलन होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे आता साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच नवा पर्याय स्वीकारत ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या सूचना साहित्य महामंडळाकडे येत आहेत; परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ऑनलाईनचा पर्याय अजिबातच अनुकूल नसल्याचे आणि ऑनलाईन आयोजन अर्थहीन असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कोरोनामुळे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात साहित्य संमेलन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन होणार नाही. साहित्य महामंडळ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर परिस्थिती सुधारत आहे, असे वाटल्यास अवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू आणि साहित्य संमेलन घेऊ.
जानेवारीमध्ये साहित्य संमेलन घेण्यासंबंधी विचार करण्यात येईल.
चौकट :
या ठिकाणांहून आले आहेत प्रस्ताव
९४ वे साहित्य संमेलन झाले तर ते होणार कुठे, याविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. याविषयी विचारले असता ठाले पाटील म्हणाले की, नाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेत; परंतु हे प्रस्ताव कोरोनाची लाट येण्यापूर्वी आलेले आहेत. आता सर्वकाही बदलून गेले आहे. त्यामुळे आलेल्या प्रस्तावांपैकीही किती जण आता साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.