औश्यात आॅनलाईन सातबारा झाला आॅफ लाईन
By Admin | Updated: June 21, 2015 00:21 IST2015-06-21T00:21:34+5:302015-06-21T00:21:34+5:30
औसा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला सातबारा कुठल्याही कामासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून आवश्यक आहे़ मागील दोन वर्षापासून हस्तलिखीत सातबारा बंद झाला होता़

औश्यात आॅनलाईन सातबारा झाला आॅफ लाईन
औसा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला सातबारा कुठल्याही कामासाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून आवश्यक आहे़ मागील दोन वर्षापासून हस्तलिखीत सातबारा बंद झाला होता़ तर सेतू सुविधा केंद्र किंवा सलाठ्याकडून आॅनलाईन सातबारा दिला जात होता़ पण मागील महिनाभरापासून आॅनलाईन सातबाराच आॅफलाईन झाल्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे़ सातबारा मिळत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत़ त्यामुळे आॅनलाईन सातबारा तलाठ्याकडून देण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे़
औसा तालुक्यात ७ महसूल मंडळे, ४६ तलाठी सज्जे, ७० हजार २९४ शेतकरी खातेदार आहेत़ यामध्ये ५३ हजार ७७७ अल्पभूधारक तर १६ हजार ५१७ बहुभूधारक शेतकरी खातेदार आहेत़ या सर्व खातेदारांना आता सातबाराच मिळत नाही़ तहसील कार्यालयातून सेतूसुविधा केंद्र, महा-ई सेवा केंद्र व तलाठ्याकडूनही आॅनलाईन सातबारा मिळत नाही़ सध्या पीककर्ज, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना सातबाराची गरज आहे़
शेतकऱ्यांचा कर्जबोजा नोंद वाटणी, फेरफार जमीन यासाठी सातबारा मिळत नसल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत़ आता खरीप हंगाम सुरु झाला असल्यामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत़ हवामानावर आधारीत पीकविमा भरण्यासाठी केवळ १० दिवस शिल्लक आहेत़ परंतु आतापासूनच सातबाराच मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे़ तात्पूरत्या स्वरुपात तलाठ्याकडून सातबाराचे वितरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे़
यासंदर्भात औसा येथील सेतूसुविधा केंद्रातील मारोती बनसोडे म्हणाले, की नव्याने अपडेट झालेला संगणकीकृत सातबारा सेतूसुविधा केंद्रामधून निघत नाही़ म्हणून सातबारा देण्याचे काम बंद केल्याचे त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)