सोशल साईटच्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ जुगार
By Admin | Updated: June 22, 2014 00:04 IST2014-06-21T23:23:57+5:302014-06-22T00:04:53+5:30
शिरीष शिंदे , बीड सोशल नेटवर्किंग साईट किंवा ई-मेल अॅड्रेसवरील कॉन्टॅक्टस वापरुन ‘तीन पत्ती’ या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने जुगार खेळला जात असल्याची बाब समोर आली आहे.

सोशल साईटच्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ जुगार
शिरीष शिंदे , बीड
सोशल नेटवर्किंग साईट किंवा ई-मेल अॅड्रेसवरील कॉन्टॅक्टस वापरुन ‘तीन पत्ती’ या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने जुगार खेळला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘आॅनलाईन गेम’ असल्याने पोलीसही कारवाई करु शकणार नसल्याने सर्रासपणे जुगाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी हा खेळ खेळत आहेत.
आजच्या घडीला बहुतांश व्यक्ती अँड्रॉईड मोबाईल वापरत आहेत. हाय-प्रोफाईल व्यक्ती ते महाविद्यालयीन तरुणांमध्ये अँड्रॉईड मोबाईल वापरण्याची फॅशन रुढ झाली आहे. अँड्रॉईड मोबाईलवर दोन लाखांहून अधिक दररोज वापरली जाणारे अॅप्स उपलब्ध आहेत. गेम्स अॅप्समध्ये ‘तीन पत्ती’ नावाचा आॅनलाईन गेम फेमस झाला आहे. पैसे लावून तिर्रट नावाचा खेळ खेळला जातो. त्याच पद्धतीचा हा तीन पत्ती नावाचा खेळ असल्याने हे अॅप्स जुगारी व्यक्त मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करुन घेत आहे. हा गेम आॅनलाईन असल्याने पोलिसी कारवाईची भीती नसल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जुगार खेळला जात आहे.
तीन पत्ती अॅप्सची कार्यपद्धती
अँड्रॉईडबेस असलेल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून तीन पत्ती नावाचे अॅप्स डाऊनलोड केले जाते. अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर फेसबुक व ई-मेल अॅड्रेस टाकून तीन पत्ती गेम खेळत असणाऱ्यांची यादी व नावे समोर येतात. गेम खेळण्यापूर्वी डाऊनलोड केलेल्याच्या खात्यावर दहा हजार कॉईन्स अमेरिकन डॉलर पद्धतीचे येतात. हे पैसे केवळ व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीचे असतात. त्या प्रत्यक्षात रोख पद्धतीत मिळत नाहीत. ते इतर कोणाशी खेळत असल्यास त्यांच्यातही सहभागी होता येते. एका गेममध्ये पाच सदस्य असतात. जे युवक मनोरंजन म्हणून हा गेम खेळतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कॉईन्स जमा होतात. हेच कॉईन्स जुगारी व्यक्ती दीड ते दोन हजार रुपये देऊन खरेदी करतात.
अधिक कॉईन्स असणाऱ्यांना
मिळतो मोठा टेबल
तीन पत्ती गेम खेळणाऱ्या व्यक्तींकडे जेवढे कॉईन्स असतात तेवढा मोठा टेबल खेळण्यास मिळतो. एक कॉईन्स खरेदी करण्यासाठी ६६ रुपये मोजावे लागतात. अर्थात हे पैसे मोबाईलधारकाच्या खात्यामधून वजा होतात. त्यामुळे व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीचे कॉईन्स खरेदी करण्यास जुगारी प्राधान्य देतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या टेबलमध्ये सहभागी होऊन हजारो रुपयांचा डाव रंगतो. कोणत्या डावाला किती रुपये हे ठरविले जाते. त्यानुसार तीन पत्तीचा डाव रंगतो.
अँड्रॉईड मोबाईलची विक्री वाढली
जुगार खेळण्याची पद्धत बदलत चालली आहे. अँड्रॉईड मोबाईल हे कमी दरात उपलब्ध झाले असल्याने जुगारी हे मोबाईल्स खरेदी करत आहेत. अँड्रॉईड मोबाईलची विक्रीही वाढली आहे.
मनोरंजनाकडून क्राईमकडे
तीन पत्ती हे अॅप्स मूळचे अमेरिकेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा आॅनलाईन पद्धतीचा खेळ खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र, त्याचा जुगार गैरवापर करीत आहेत. तीन पत्ती हा गेम मोबाईलवरुन आॅनलाईन पद्धतीने खेळला जात आहे. तर वेबसाईटवरुन रमी हा गेमही याच पद्धतीने खेळला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिकारी म्हणाले हा पुरावा नाही....
बीड येथील एका पोलिस अधिकाऱ्यास आॅनलाईन पद्धतीचा जुगार खेळत असणाऱ्यांवर कारवाई करता येईल? काय याची विचारणा केली असता, ते म्हणाले की, आॅनलाईन गेम खेळणे हा गुन्हा ठरु शकत नाही. त्यांना एकाच ठिकाणाहून पकडले तरी हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. कारवाईसाठी काय करता येईल ते आणखी अभ्यास करुन पहावे लागले, असे त्यांनी सांगितले.
जुगाऱ्यांना नाही भीती
एरव्ही तिर्रट नावाचा जुगार खेळताना पकडल्यास पोलिस कारवाई करतात मात्र आता हाच खेळ तीन पत्ती नावाच्या अॅप्सच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने खेळला जात आहे. त्यामुळे पोलिस पकडण्याची भीती या जुगाऱ्यांना नसते. एका रुममध्ये मोबाईलवरुन हा गेम खेळत असल्यास पोलीस कारवाईस आले तरी कारवाई करणे त्यांना शक्य होणार नसल्याची प्रतिक्रिया एका जुगाऱ्याने दिली.