सारडांच्या निवडीवरुन ‘आॅनलाईन’ शिवीगाळ
By Admin | Updated: May 18, 2015 00:21 IST2015-05-17T23:59:07+5:302015-05-18T00:21:00+5:30
शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आदित्य सारडा यांची निवड झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या एका संकेतस्थळावर पोस्ट पडल्या

सारडांच्या निवडीवरुन ‘आॅनलाईन’ शिवीगाळ
शिरीष शिंदे , बीड
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आदित्य सारडा यांची निवड झाल्यानंतर सोशल मिडीयाच्या एका संकेतस्थळावर पोस्ट पडल्या. मात्र, त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. त्यावरून ठिणगी पडली. सारडा समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हा ‘आॅनलाईन’ वाद उफाळून आला. एवढ्यावरच तो थाांबला नाही तर एकमेकांना चक्क शिवीगाळ केली. हे प्रकरण वाढू नये म्हणून नंतर त्यांनी ती पोस्ट काढून टाकल्या.
सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून आदित्य सारडा यांचे नाव समोर आल्यानंतर शहरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरु झाली. संचालक मंडळामध्ये राजकारणाचा वेगवेगळ्या पदांचा अनुभव असणाऱ्या लोकांचा समावेश होता मात्र त्यांची निवड न करता सहकार किंवा इतर कोणताही अनुभव नसताना त्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे २४ वर्ष आहे. ‘पोरा-सोरांच्या हातात पालकमंत्र्यांनी बँक दिली, ज्या बँकेत कोट्यावधींचा व्यवहार होतो त्याच्या प्रमुख पदावर तरुणाची निवड केली’ अशी चर्चा अनुभवी राजकारण्यांनी केली. सांयकाळी सहाच्या सुमारास शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी अध्यक्षांच्याबाबत एक चर्चात्मक पोस्ट टाकली. वरील विषयासंबंधीत ही असलेली पोस्ट भाजपा कार्यकर्त्यांच्या पसंतीला उतरली. प्रारंभी हळुहळू भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनी केलेली निवड चुक असल्यचे समर्थन केले. तसेच ही पोस्ट टाकून तुम्ही आमची ‘खदखद’ व्यक्त केली अशी प्रतिक्रीया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली. सारडा समर्थक चिडले. त्यांना प्रतिउत्तर देत पालकमंत्र्यांची निवड योग्य कशी आहे याचा पाढा वाचला. राजकारणात प्रत्येकजण शेवटपर्यंत शिकतच असतो, असा सूर त्यांनी लावला.
सांयकाळी सहाच्या सुमारास सुरु झालेली पोस्टवरील चर्चा रंगत गेली. रात्री नऊच्या सुमारास वादाचे रुपांतर शिवीगाळ मध्ये झाले. सारडा समर्थक व भाजप कार्यकर्ते एकमेकांना अर्वाच्च भाषा वापरत पोस्ट टाकु लागले, रात्री आकरा पर्यंत जवळपास १४० पोस्ट झाल्या. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासूनच पुन्हा सारडा समर्थक व भाजपा कार्यकर्ते आॅनलाईन झाले व त्यांनी पुन्हा कॉमेंट्स करण्यात सुरुवात केली. दुपारी बारा पर्यंत हा वादग्रस्त पोस्टचा वाद सुरु राहिला. हे प्रकरण हाता बाहेर जाईल म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी टाकलेली मूळ पोस्ट काढली. त्यामुळे बारा तास चालेलले आॅनलाईन युद्ध संपुष्टात आले.