पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून
By Admin | Updated: June 22, 2014 00:51 IST2014-06-22T00:42:18+5:302014-06-22T00:51:51+5:30
औरंगाबाद : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक आणि विविध कोर्सेससाठी २७ जून ते ६ जुलैदरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून
औरंगाबाद : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक आणि विविध कोर्सेससाठी २७ जून ते ६ जुलैदरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे यावर्षी प्रथमच शहरात १३ ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट सेंटर (ए.आर.सी.) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून तंत्रशिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची लगभग सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांना २६ जून रोजी गुणपत्रिका प्राप्त होणार आहेत. २७ जूनपासून पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. जे विद्यार्थी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना अप्लिकेशन रिसिप्ट सेंटरवर अॅडमिशन किट खरेदी करावी लागेल. खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपयांना, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ते ३०० रुपयांना मिळणार आहे.
एआरसी सेंटरवर शैक्षणिक कागदपत्रांसह हजर राहून विद्यार्थ्यांना नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर अॅडमिशन किट देण्यात येईल. शहरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक अभियांत्रिकी कॉलेज, वाळूज, सावित्रीबाई महिला अभियांत्रिकी कॉलेज, इंटरनॅशनल सेंटर कॉलेज आॅफ एक्सलन्स, छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी कॉलेज आणि औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे हे एआरसी सेंटर आहे. या सेंटरवर विद्यार्थ्यांना ५० रुपये शुल्क भरून इंटरनेट, झेरॉक्स आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
शासकीय तंत्रशिक्षणमध्ये ६२० जागा
शासकीय तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आॅटोमोबॉईल, कॉम्प्युटर, आय.टी., ड्रेस डिझाईन, गारमेंट डिझाईन आदी पदविका कोर्सेस आहेत.
सकाळी ७ ते २ या शिफ्टसाठी ४४०, तर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या दुसऱ्या शिफ्टसाठीची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२० असल्याचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. या स्वायत्त संस्थेत मेरिटनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.