अडत बाजारात कांदा गडगडला
By Admin | Updated: July 15, 2016 01:06 IST2016-07-15T00:36:38+5:302016-07-15T01:06:56+5:30
औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली

अडत बाजारात कांदा गडगडला
औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र चोहोबाजूंनी १५० टन कांद्यांची आवक झाल्याने भाव गडगडले. हर्राशीमध्ये क्विंटलला २५० ते ७०० रुपये नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. कारण कांद्याचा मोठा साठा कांदाचाळीत शिल्लक असून, बाजारात मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा ६ टक्के अडत देऊन खरेदीदारांनी खरेदी केला.
मागील चार दिवसांनंतर पुन्हा एकदा फळे-पालेभाज्यांच्या अडत बाजारात पहाटे हर्राशीचा आवाज कानावर पडला. सर्वप्रथम अडत्यांनी शेतकरी व खरेदीदारांना एकत्र बोलावले व अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असा राज्य सरकारचा अध्यादेश असल्याचे स्पष्ट केले. अडत देण्यास जे खरेदीदार तयार होते, त्यांनीच हर्राशीत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक अडत्याच्या दुकानासमोर हर्राशी करण्यात आली. चार दिवसांनंतर अडत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या काळात अनेक जण कांदा खात नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने कांद्याचा उठाव कमी राहणार असल्याने खरेदीदारांनी हर्राशीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील आठवड्यात ३०० ते ८०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी भावात विकावा लागला. अजून शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून, येत्या दीड महिन्यानंतर कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक सुरूहोईल. तेव्हा कांद्याचे भाव आणखी कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या दीड महिन्यात आपल्याकडील कांदा विक्री करावा लागणार आहे.
कांद्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतील, या आशेने शेतकरी आले होते. मात्र हर्राशी कमी भावात झाल्याने शेतकरी संतापले होते. अडत खरेदीदारांकडून वसूल केल्यामुळेच खरेदीदारांनी कमी बोली लावून कांद्याचे भाव पाडले, असा आरोप शेतकरी करीत होते. अन्य फळ, पालेभाज्यांचीही चांगली विक्री झाली.