रांजणगावात एकाचे डोके फोडले
By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:09+5:302020-11-28T04:10:09+5:30
वाळूज महानगर : रांजणगावात किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत एकास मारहाण करून त्याचे डोके फोडणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

रांजणगावात एकाचे डोके फोडले
वाळूज महानगर : रांजणगावात किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत एकास मारहाण करून त्याचे डोके फोडणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पासाहेब दशरथ म्हैसमाळे (३१) हा घरी असताना बुधवारी (दि.२५) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विजय व गोविंद (पूर्ण नावे माहीत नाहीत) या दोघांनी किरकोळ कारणावरून अप्पासाहेब यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात गोविंद याने अप्पासाहेब याच्या डोक्यात दांडा मारल्याने त्याचे डोके फुटले. याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारसाठी विवाहितेचा छळ
वाळूज महानगर : कार खरेदी करण्यासाठी माहेरहून ४ लाखांची मागणी करून एका २० वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा राजेंद्र पाठे (२० रा. तीसगाव परिसर) या विवाहितेस सासरच्या मंडळींनी कार खरेदीसाठी ४ लाखांची मागणी करून तिला घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून पूजा हिने पती राजेंद्र पाठे, सासरे लक्ष्मण पाठे, सासू राधाबाई पाठे तसेच नणंद व नंदई अशा चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उद्योगनगरीत दोन संशयित ताब्यात
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत रात्री अंधारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उद्योगनगरीत गुरुवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलीस गस्त घालत असताना वैष्णोदेवी उद्यानाजवळ दोन संशयित पोलिसांना अंधारात लपून बसलेले दिसून आले. पोलीस पथकाने अशोक विठ्ठल गुळे (२७) व अजिंक्य विजय गावंडे (१९, दोघेही रा. रांजणगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
वाळूज येथे जलवाहिनीला गळती
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. ग्रामपंचायतीच्या लक्ष्मी गायरानातील सार्वजनिक विहिरीवरून गेलेल्या जलवाहिनीला गळती लागली आहे. जलवाहिनीचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे या परिसरातील शेतकºयांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रोथ सेंटरच्या गतिरोधकाची दुरवस्था
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील ग्रोथ सेंटरजवळ असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावर ग्रोथ सेंटरजवळील हे गतिरोधक वाहनाच्या वर्दळीमुळे जमीनदोस्त झाले आहे. या गतिरोधकाजवळ ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करीतच ये-जा करावी लागत आहे. या गतिरोधकाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
स्मशानभूमी रोडवर कचऱ्याचे ढिगारे
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील स्मशानभूमीच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पडल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोहटादेवी चौकातील भाजी विक्रेते टाकाऊ भाजीपाला आणून टाकतात. या परिसरातील व्यावसायिक व नागरिकही रस्त्यालगत कचरा टाकत असल्यामुळे या ठिकाणी ढिगारे साचले आहेत.