छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाजवळ फुटलेली ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सोमवारी दुपारी ४ वाजता दुरुस्त झाली. त्यानंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. मात्र ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी रात्री उशिरापर्यंत सुरू झाली नव्हती. दोन जलवाहिन्या बंद असल्याने शहरात पाण्याचा ठणठणाट सुरू झाला.
७०० मिमी व्यासाची जलवाहिनी शनिवारी सकाळी फुटली. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली होती, त्यावर ९०० मिमी जलवाहिनी गेली होती. जेव्हापर्यंत ९०० मिमीचे एक किंवा दोन पाइप बाजूला करणार नाहीत, तोपर्यंत ७०० मिमीची जलवाहिनी दुरुस्त करणे अशक्यप्राय ठरत होते. शेवटी सोमवारी जलवाहिनीचे पाइप सहा ते आठ इंच वर उचलण्यात आले. त्यानंतर जुनी जलवाहिनी दुरुस्त झाली. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने पहिला पंप सुरू करून जलवाहिनीची चाचणी घेतली. कुठेही गळती नसल्याचे लक्षात आल्यावर उर्वरित पंप सुरू करून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू केले. दोन दिवसांचा खंड पाणीपुरवठ्यात पडला. त्यामुळे पाण्यासाठी विविध वसाहतींमध्ये हाहाकार सुरू झाला.
कालचे टप्पे आज, आजचे उद्यारविवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्या वसाहतींना सोमवारी पाणी देण्यात आले. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देणे शक्य झाले नाही, त्यांना आता मंगळवारी पाणी मिळेल, असे मनपाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, तो पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील.
९०० मिमी जलवाहिनी बंद९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून किमान २० एमएलडी पाणी मिळते. हे पाणी रविवारपासून बंद असल्याचे ऐन उन्हाळ्यात मनपाला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.