' गोल्याचा केला गेम' ; औरंगाबादेत एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:37 IST2018-04-05T12:36:13+5:302018-04-05T19:37:31+5:30
जयसिंगपुरा येथे राहणाऱ्या अजय तिडके या युवकाची त्याच्याच मित्राने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आले.

' गोल्याचा केला गेम' ; औरंगाबादेत एकतर्फी प्रेमप्रकरणातून मित्राची हत्या
औरंगाबाद : जयसिंगपुरा येथे राहणाऱ्या अजय तिडके या युवकाची त्याच्याच मित्राने एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान उघडकीस आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृताच्या रूममेटला," गोल्याचा केला गेम " असे म्हणत तेथून थेट बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले.
या प्रकरणी पोलिसांनी अजयचा मित्र मंगेश वायव्ह्ळ याला अटक केली आहे. या बाबत बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय तिडके उर्फ गोल्या व आरोपी मंगेश वायव्हळ हे मित्र असून दूरचे नातेवाईक पण आहेत. अजयचे त्यांच्याच नात्यामधील एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. यासोबतच ती मुलगी आरोपी मंगेश याच्याशीसुद्धा बोलत असे. मंगेशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. यामुळे अजय व त्या मुलीचे प्रेमप्रकरण त्याला मान्य नव्हते. यातूनच मंगेशने अजयला संपवण्याचा कट रचला. यानुसार तो काल पुण्याहून औरंगाबादला आला आणि रात्री उशिरा अजयच्या रामेश्वर अपार्टमेंटमधील फ्लॅटवर गेला.
पट्ट्याने आवळला गळा
फ्लॅटवर येताच मंगेशने अजयच्या रूममेटला मला याच्याशी काही खाजगी बोलयाचे आहे तुम्ही दुसऱ्या रूममध्ये जा असे सांगितले. यानंतर रात्री चार ते पाच वाजेच्या दरम्यान त्याने आधीच सोबत आणलेल्या पट्ट्याने अजयचा गळा आवळला. अजय मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तब्बल दोन तास तो तिथेच बसून राहिला.
'गोल्याचा केला गेम'
सकाळी सहा वाजता मंगेश रुमच्या बाहेर आला. यावेळी बाहेर अजयचे रुममेट अभ्यास करत होते. त्यांना, 'गोल्याचा केला गेम' असे म्हणत तो तेथून बाहेर पडला. यावेळी अजयच्या रूममेटला तो गंमत करत असल्याचे वाटले. मात्र काही वेळाने अजयची हत्या झाल्याचे त्यांच्या उघडकीस आले.
यानंतर मंगेशने थेट बेगमपुरा पोलीस स्टेशन गाठले व आत्मसमर्पण केले. शहरात पंधरा दिवसापूर्वीच संकेत कुलकर्णी याची एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आज ही दुसरी घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.