सायकल दाखविली एक आणि पुरवठा केली दुसरीच

By Admin | Updated: July 23, 2014 00:42 IST2014-07-23T00:34:59+5:302014-07-23T00:42:16+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या गुणवत्तेवरून शिवसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे.

One showed the bicycle and the second made the supply | सायकल दाखविली एक आणि पुरवठा केली दुसरीच

सायकल दाखविली एक आणि पुरवठा केली दुसरीच

औरंगाबाद : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने शहरातील ६१६ विद्यार्थिनींसाठी खरेदी केलेल्या सायकलींच्या गुणवत्तेवरून शिवसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या सभापतीच्या काळात खरेदी केलेल्या सायकली भंगार असल्याचे कारण पुढे करून सभापती विजय वाघचौरे आणि सभागृह नेते किशोर नागरे यांनी सायकल वाटपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, तर प्रशासनाने सायकलींची गुणवत्ता एकदम चांगली असल्याचा दावा करीत मनपा शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे धूमधडाक्यात वाटप करून सगळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. महापौर कला ओझा, सभापती कमल नरोटे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, उपायुक्त रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
भंगार सायकलींचा पुरवठा
अहमदनगर येथील संजय ट्रेडर्स या संस्थेने हिप्पो या कंपनीच्या सायकली पुरविल्या आहेत. ३ हजार ८३१ रुपयांना हिप्पो या कंपनीची लेडीज सायकल कंपनीच्या वेबसाईटवर पाहिली तर ती सायकल वेगळी आहे, पालिकेस पुरवठा केलेली सायकल वेगळी आहे. फोर्क बास्केट, मर्डगार्ड, स्टॅण्ड, बे्रक्स, साडीगार्ड या वस्तू सायकलीला दिसत नाहीत. शिवाय स्टीलचे मटेरियल सायकलीमध्ये कमी प्रमाणात आहे. त्यामुळे ती सायकल ३ हजार ८३१ रुपयांची नसून ती २३०० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात ३६०० रुपयांना बॅ्रण्डेड लेडीज सायकल मिळते.
उपायुक्तांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
उपायुक्त रवींद्र निकम यांना सायकल खरेदीप्रकरणी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी अशी दिली.
निविदा कधी काढल्या?
- डिसेंबर २०१३ मध्ये
किती निविदा आल्या?
- औरंगाबादच्या यश, नाझ ट्रेडिंग व अहमदनगरच्या संजय ट्रेडिंग अशा तीन पुरवठादारांच्या निविदा आल्या.
कुणी किती रक्कम टाकली?
- यश व नाझ ट्रेडिंगने ४५०० तर संजय ट्रेडिंगने ३ हजार ९०९ रुपयांची निविदा भरली. संजय ट्रेडिंगने २ टक्के दर कमी केल्याने रेट कॉन्ट्रक्टनुसार खरेदी केली.

बाजारात चौकशी केली होती का?
- हो, माझ्या माणसाला पाठवून इतर कंपनीच्या सायकलींचे दर बाजारातून मिळविले होते.
सायकल फिटिंग करणारे म्हणतात २३०० रुपयांची सायकल आहे?
- ते काहीही सांगतील, मी काय बोलणार त्यांच्या सांगण्यावर.
शिलाई मशीन, सायकलींचा पुरवठादार एकच कसा
- रेट कॉन्ट्रक्टवर खरेदी केली आहे, योगायोग असेल तो फक्त.
गुणवत्ता पाहिली होती का
- कंत्राटदारांना वेळेवर पेमेंट मिळत नाही. म्हणून सगळी तडजोड करावी लागते.

Web Title: One showed the bicycle and the second made the supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.