दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाची वाढ
By Admin | Updated: April 27, 2016 00:31 IST2016-04-26T23:59:25+5:302016-04-27T00:31:26+5:30
औरंगाबाद : २१ एप्रिलपासून जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ केली असल्याची घोषणा आज येथे केली.

दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाची वाढ
औरंगाबाद : २१ एप्रिलपासून जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ केली असल्याची व त्याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे ३० ते ३५ हजार दूध उत्पादकांना होणार असल्याची घोषणा आज येथे दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका पत्रपरिषदेत केली.
त्यांनी सांगितले की, शासनाचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफकरिता प्रतिलिटर २० रु. दर आहे. तोच संघाचा दर प्रतिलिटर १ रुपया करण्यात आलेला आहे. शासन व्यवस्थापन खर्च प्रतिलिटर ७० पैसेप्रमाणे आहे. तोच व्यवस्थापन खर्च संघाचा प्रतिलिटर एक रुपया
आहे.
जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे सध्या दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच तूप, श्रीखंड, आम्रखंड, दही, पनीर, लस्सी, ताक, गोड दूध इ.ची निर्मिती करण्यात येत आहे. या दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्याकरिता संघाने दोन नवीन गाड्या खरेदी करून त्याद्वारे या दुग्धजन्य पदार्थांची विक्री विदर्भ व मराठवाड्यामध्ये करण्यात येणार आहे. कारण दुग्धजन्य पदार्थांची जास्तीत जास्त विक्री झाल्यास दूध उत्पादकांना आणखी चांगल्याप्रकारे दर देण्याचा संघाचा मानस आहे, अशी माहिती देऊन बागडे यांनी सांगितले की, स्वच्छ दूध निर्मिती योजनेंतर्गत दूध उत्पादकांसाठी पाच लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या आठ हजार नग कॅन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्याची किंमत जवळपास ३० लाख रुपये आहे. येत्या १५ दिवसांत दूध उत्पादकांना या कॅनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ दूध निर्मिती योजनेअंतर्गत ज्या संस्था चांगल्या प्रकारे दूध संकलन करतात, त्या जवळपास ६५ संस्थांना सुमारे २५ लाख किमतीचे दूध तपासणी यंत्रे संघामार्फत मोफत वाटप करण्यात येणार आहे.
गतवर्षीपेक्षाही यावर्षी दुष्काळ असताना जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ झाली आहे, हे विशेष होय. या पत्रपरिषदेस दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक पुंडलिक काजे, सविता अधाने व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
दारू व बीअर कंपन्यांच्या पाणीकपातीसंबंधीच्या उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे हरिभाऊ बागडे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, सरकारचेही हेच धोरण होते. पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम दिलाच पाहिजे. पाण्याचे संकट आणखी दोन महिने राहील.