मारहाणप्रकरणी एकास चार वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: January 28, 2015 00:55 IST2015-01-28T00:53:54+5:302015-01-28T00:55:49+5:30
उमरगा : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत एकास लाकडाने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकास चार वर्षे सक्तमजुरी

मारहाणप्रकरणी एकास चार वर्षे सक्तमजुरी
उमरगा : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत एकास लाकडाने जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकास चार वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपयांचा दंड उमरगा येथील न्यायालयाने सुनावला़ हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़एस़मुंगले यांनी दिला़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता, व्ही़एस़आळंगे यांनी दिलेली माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील बलसूरवाडी येथे २९ सप्टेंबर २०१२ रोजी गणेशविसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती़ या मिरवणुकीत संभाजी पांडुरंग तुरोरे-पवार यांना गावातीलच परमेश्वर बलभीम सरवदे (वय-२८) याने ‘तू मला धक्का का मारला व लाथ का मारलीस’ असे म्हणत काठीने डोक्यात मारून जखमी केले होते़
दुसऱ्या दिवशी संभाजी तुरोरे यांना चक्कर आल्याने त्यांचा भाऊ व्यंकट तुरोरे यांनी १ आॅक्टोबर २०१२ रोजी जखमी संभाजी यांना उमरगा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ याबाबत व्यंकट तुरोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर सरवदे याच्याविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुरनं १८४/१२ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दवाखान्यातील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ३२६ हे कलम वाढविण्यात आले होते़ संभाजी तुरोरे यांना त्यानंतर सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना ८ आॅक्टोबर २०१२ रोजी संभाजी तुरोरे यांचा मृत्यू झाला़ त्यानंतर ३०२ हे कलम वाढविण्यात आले होते़
याप्रकरणाचा तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़डीग़ुंडीले यांनी तपास करून उमरगा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ त्यानंतर हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता़
या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष, अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम़ एस़ मुंगले यांनी आरोपी परमेश्वर बलभीम सरवदे यास भादंवि कलम ३२६ अन्वये चार वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंड, व दंड न दिल्यास एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ दंडाची रक्कम मयताची पत्नी राजश्री तुरोरे यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले़ (वार्ताहर)४
या प्रकरणात एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले़ मात्र, सुनवणी सुरू असताना एक-दोन नव्हे तब्बल दहा साक्षीदार फितूर झाले होते़ यातील काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते़ याप्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ़ चांदेकर यांचा शवविच्छेदन अहवाल, दोन प्रत्यक्षदर्शी, राजश्री तुरोरे यांची साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली़
या प्रकरणात परमेश्वर बलभीम सरवदे यांच्याविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुरनं १८४/१२ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दवाखान्यातील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ३२६ हे कलम वाढविण्यात आले होते़ तर संभाजी तुरोरे यांच्या मृत्यूनंतर भादंवि कलम ३०२ वाढविण्यात आले होते़ न्यायालयात प्रकरण सुरू असताना परमेश्वर सरवदे यांची न्यायालयाने भादंवि कलम ३०२ मधून निर्दोष मुक्तता केली़ तर कलम ३२६ मध्ये शिक्षा सुनावली़