आणखी एकाचा राजीनामा

By Admin | Updated: July 13, 2017 01:04 IST2017-07-13T00:56:33+5:302017-07-13T01:04:53+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या धरसोड धोरणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

One more resignation | आणखी एकाचा राजीनामा

आणखी एकाचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या धरसोड धोरणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. इंग्रजी विभागातील दोन प्राध्यापकांच्या किरकोळ वादावादीमुळे थेट विद्यार्थी कल्याण आणि फॉरेन स्टुडंट सेलचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांच्याकडून दोन्ही पदांचा राजीनामा लिहून घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या निर्णयामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या निर्णयाच्या विरोधात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी गुरुवारी कुलगुरूंची भेट घेणार आहेत.
इंग्रजी विभागातील प्राध्यापकांच्या बैठकीमध्ये एक महिला प्राध्यापिकेसोबत डॉ. मुस्तजीब खान यांचा शनिवारी वाद झाला होता. त्या महिला प्राध्यापिकेने प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील यांच्याकडे त्याच दिवशी तक्रार
केली. यावर डॉ. पाटील यांनी सोमवारी विभागातील सर्वच प्राध्यापकांची बैठक घेतली. तेव्हा त्यांनी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती कुलगुरू विद्यापीठात परतल्यानंतर त्यांना सांगणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले होते.
बुधवारी कुलगुरू विद्यापीठात परतल्यानंतर संबंधित प्राध्यापिकेने त्यांच्या दालनात ‘रडारड’ करीत डॉ. मुस्तजीब खान यांची दोन्ही पदे काढण्यासह इतर तीन मागण्या ठेवल्या होत्या. या मागण्यांवर कुलगुरूंनी सायंकाळी उशिरा डॉ. खान यांच्याकडून माफीनामा लिहून घेत दोन्ही पदांचा राजीनामा घेतल्याचे समजते. या प्रकारामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
तत्कालीन परीक्षा नियंत्रण कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनाही संघटनांनी आरोप करताच कुलगुरूंनी पदावरून हटवले होते.
यानंतर तीन वर्षांच्या कार्यकाळात कुलसचिवपदी तब्बल १३, परीक्षा नियंत्रकपदी ४, वित्त व लेखाधिकारीपदी ३ जणांनी काम पाहिले आहे. या धरसोड निर्णयामुळे डॉ. प्रदीप जब्दे यांना गैरमार्गाने
पदावर कायम ठेवण्याची नामुष्की ओढावली होती. आताही डॉ. जब्दे यांची मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांसाठी कार्यकाळ वाढवून दिला आहे.

Web Title: One more resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.