सरकारला एक महिन्याची मुदत
By Admin | Updated: August 17, 2015 00:10 IST2015-08-17T00:10:26+5:302015-08-17T00:10:26+5:30
परभणी : ज्या जिल्ह्याने शेतीचे आदर्श मांडले, शेती कशी करायची ते शिकविले. परंतु, त्याच परभणी जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. सरकार या शेतकऱ्यांना मदत देत नाही.

सरकारला एक महिन्याची मुदत
परभणी : ज्या जिल्ह्याने शेतीचे आदर्श मांडले, शेती कशी करायची ते शिकविले. परंतु, त्याच परभणी जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. सरकार या शेतकऱ्यांना मदत देत नाही. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. दुष्काळी मदतीसाठी शासनाला एक महिन्याची संधी दिली असून, त्यानंतर मात्र जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे आयोजित दुष्काळ परिषदेमध्ये दिला.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार तीन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित दुष्काळ परिषदेत पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, माजीमंत्री सुरेश धस, माजीमंत्री फौजिया खान, राकाँ जिल्हाध्यक्ष आ.विजय भांबळे, आ. बाबाजानी दुर्राणी, आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, आ. रामराव वडकुते, आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. अमरसिंह पंडित, जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, महापौर संगीता वडकर, माजी खा. गणेशराव दुधगावकर, माजी खा. सुरेश जाधव, शंकरअण्णा धोंडगे, बाळासाहेब जामकर, भीमराव हत्तीअंबिरे, माजी महापौर प्रताप देशमुख, राकाँचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, संतोष बोबडे, अजय चौधरी, संजय कदम, सुरेश भुमरे, भीमराव वायवळ आदींची उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्री असताना मी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या हवामान खात्याचा अंदाज घेत असे. यावर्षी मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि सोलापूर, सांगली या भागात कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे पाऊस झाला नाही तर परिस्थिती गंभीर होईल म्हणून जून महिन्यातच सरकारला उपाययोजना करण्याची विनंती केली होती. परंतु सरकारने उपाययोजना केली नाही. आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. बँकेला कुठल्याही सूचना नाहीत. त्यामुळे सरकारचे काम हे ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी’ असे आहे, असे सांगून काळ्या आईशी जो इमान राखणार नाही, त्याला धडा शिकविला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिली.
गावात अन् शेतात काम राहिले नसल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. घर-दार सोडून पुण्यासारख्या ठिकाणी हजारो लोक कामाच्या शोधात येत आहेत, हे चित्र भयानक आहे. परंतु, शासन याकडे बघत नाही. ही बाब आता सहन होत नाही. त्यामुळे यावर काही तरी मार्ग काढलाच पाहिजे. सध्या पाऊस नाही. पावसाची प्रतीक्षा करणे ठीक आहे. परंतु, पाऊस झालाच नाही तर पुढील जूनपर्यंत जगायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. शासनाला एक महिन्याची सवलत दिली आहे. या काळात शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, त्याला धीर द्यावा अन्यथा राज्यभर जेलभरो आंदोलन करुन सरकारला मदत करण्यास भाग पाडू, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला. या परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाच्या ध्येय धोरणावर कडाडून टीका केली. कुठलाही विषय आला की, शासन तुम्ही १५ वर्षांत काय केले, असे विचारते. परंतु, आम्ही केलेल्या कामांचा पाढा वाचला तर तो खूप मोठा होईल. शरद पवार यांनी शेतकऱ्यांना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. त्यामुळेच शेतकरी संकटातून बाहेर पडू शकला, असे सांगत शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौरा काढत असल्याने मुख्यमंत्र्याच्या पोटात दुखत आहे. दुष्काळग्रस्त गावात कर्ज माफी करा, अशी मागणी आम्ही २ जून रोजीच केली. परंतु, मुख्यमंत्र्यांना पाझर फुटला नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सभागृहाचे कामकाज साडेतीन दिवस बंद पाडले. परंतु, शेतकऱ्यांचे दु:ख सरकारला समजत नाही. या शासनात एकही शेतकऱ्याचे पोर नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे दु:ख समजायला त्याच्या जन्माला जावे लागते, असे ते म्हणाले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रसंगी रुमणं हातात घेण्याची ताकद देखील आमची आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी राकाँ जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील परिस्थिती मांडली. जिल्ह्यात आजपर्यंत ५६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. चारा शिल्लक नसल्याने जनावरे धरणात सोडावी लागत आहेत. शेतकरी संकटात आहे. राकाँ अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या संकटाला धावून आले. सरकारने मदत केली नाही तर आंदोलनासाठी आम्ही तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आपल्या भाषणात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले, विधान परिषदेत आमची ताकद मोठी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला अनेकवेळा आम्ही जाब विचारले. परंतु, सरकारने दखल घेतली नाही. खोटे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. या परिस्थितीचे आपल्यालाच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, असे सांगून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरु, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खा. गणेशराव दुधगावकर, माजी राज्यमंत्री फौजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर यांचीही भाषणे झाली. अडीच तास चाललेल्या या परिषदेस परभणी जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)