दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी
By Admin | Updated: April 14, 2015 00:46 IST2015-04-14T00:46:35+5:302015-04-14T00:46:35+5:30
तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी
तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील काक्रंबा गावाजवळ जीप पलटी होवून एकजण ठार तर सहाजण जखमी झाले. लातूर तालुक्यातील कदम व जाधव कुटुंब रविवारी रात्री एमएच २४/ व्ही ५७६० या क्रमांकाच्या जीपमधून तुळजापूर येथून देवी दर्शन करून गावाकडे परतत होते. तुळजापूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर त्यांची जीप पलटी झाली. यात चालक बिभीषण जगन्नाथराव सुरवसे (वय ३८, रा. पेठ, ता. जि. लातूर) हे जागीच ठार झाले. तर शालुबाई दिगंबर कदम (वय ६५), मुक्ता परमेश्वर कदम (वय ५८, रा. वायलगाव), स्वाती अविनाश जाधव (वय २२), नंदिनी अविनाश जाधव (वय ०२, रा. व्होताला, चिंचोली) हे गंभीर जखमी झाले. तसेच अविनाश जाधव व पायल जाधव हेही किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, मयत बिभीषण सुरवसे यांचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
दुसरा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर-सोलापूर मार्गावर घडला. यात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले़ पोलिसांनी सांगितले की, सिंदफळ येथील मारोती बबन शितोळे (वय-२५), नाना विश्वनाथ पांडागळे (वय-४०) व विठ्ठल गोविंद सरवदे (वय-४५) हे तिघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून तुळजापूरकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी महामार्गावरील एका ढाब्याजवळ आली असता अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली़ अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले़ जखमींवर तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते़ प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ (वार्ताहर)