एक दिवस निसर्गासोबत...
By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-08-01T00:35:12+5:302014-08-01T01:06:17+5:30
सचिन मोहिते, नांदेड दाटलेल्या आभाळातून बेधुंद होवून सर्वदूर बरसणारा पाऊस़़़ डोंगरदऱ्यातून सुसाट कोसळणारा धबधबा़़़ हिरव्यागर्द रंगाने व्यापलेली झाडी़़़ पशु- पक्ष्यांचा निनाद़़़
एक दिवस निसर्गासोबत...
सचिन मोहिते, नांदेड
दाटलेल्या आभाळातून बेधुंद होवून सर्वदूर बरसणारा पाऊस़़़ डोंगरदऱ्यातून सुसाट कोसळणारा धबधबा़़़ हिरव्यागर्द रंगाने व्यापलेली झाडी़़़ पशु- पक्ष्यांचा निनाद़़़ आणि दऱ्या खोऱ्यातील निसटत्या पायवाटेने जीव मुठीत घेऊन, निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी निघालेली तरूणाई़़़़ हे चित्र नांदेड नेचर क्लब व निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने काढलेल्या नाशिक येथील पावसाळी ट्रेकिंगचे़
निसर्गाच्या सान्निध्यातील रोमांचकारी अनुभवांची शिदोरी पाठीशी घेण्यासाठी पुन्हा एकदा नांदेड नेचर क्लब व निसर्ग मित्र मंडळाने साद घातली़ आणि ५० हून अधिक सदस्यांनी प्रतिसाद दिला़ २८ जुलै रोजी नांदेडहून नाशिककडे ट्रॅव्हल्सने प्रवास सुरू झाला़ २९ जुलै रोजी सकाळी नाशिक जवळ असतानाच जोरदार पावसाशी गाठ पडली़ सकाळचा नाष्टा, चहा घेवून डोंगरचढाईला निघालेल्या तरूणाईला केव्हा एकदा निसर्गाच्या कुशीत जावे, असेच झाले होते़ पावसाचा जोर कायम असल्याने नद्या नाल्यांना आलेला पुर आणि वाहतुकीने खोळंबलेले रस्ते़ मात्र या अडथळ्यावर मात करीत तरूणांनी निसर्गाकडे धाव घेतली़
ओल्याचिंब वेशात चिखल तुडवीत, खळाळणाऱ्या पाण्यातून वाट काढीत, पाना- फुलांशी संगत करीत तर पक्ष्यांसोबत हितगुज करीत सदस्यांनी ट्रेकिंगला सुरूवात केली़ डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या दुरच्या पर्वतरांगा धुसर हिरवट रंगांनी व्यापल्या होत्या़ दुधारवाडी धबधब्याचे दृष्य डोळ्यात न सामावणारे होते़ हे चित्र पाहून तरूणांनी एकच जल्लोष केला़ निसर्गाच्या या रूपाने सर्वांचच मने प्रफुल्लीत झाले़ अजुनही पावसाची सोबत आणि तरूणाईचा उत्साह कायम होता़ डोंगरमाथ्यावरून खाली उतरताना निसटत्या वाटेवर प्रत्येक पाऊल जपून पडत होता़ जंगलातून वेगाने वाहणारी फेसाळलेली नदी पुढे येताच सर्वांचे थबकणे आणि नदीकाठावर छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करणे हे क्षण न विसरता येणारेच़ हळू हळू दिवस पश्चिमेला कलताना ढंगांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़ जंगल तुडवित निघालेल्या सदस्यांना परतीचे वेध लागले़ भिजलेल्या अंगांनी निसर्गाचा निरोप घेताना पाय जड झाले होते़ रस्त्यात छोट्या टपरीवर थांबून गरम भज्यासोबत चहाचा अस्वाद घेवून मक्यावर ताव हाणला़
सायंकाळी पुन्हा नाशिक ते नांदेड हा प्रवास सुरू झाला़ हरवत चालेल्या निसर्गावरील प्रेम वृद्धींगत करण्यासाठी या सहलीचे आयोजन केले होते़ आणि एक दिवस निसर्गासोबत म्हणत कल्बच्या सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला़ या सहलीसाठी आरती पुरंदरे, प्रमोद देशपांडे, मंजुषा देशपांडे, आतिंद्र कट्टी, प्रसाद शिंदे, महेश होकर्णे, निलेश पेठकर आदींचा सहभाग होता़