नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...

By Admin | Updated: August 15, 2014 01:12 IST2014-08-15T00:48:24+5:302014-08-15T01:12:06+5:30

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात.

One day to the leader, we are honored every day ... | नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...

नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...


शांतीलाल गायकवाड 
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात. सामान्य प्रशासन विभागाकडे ध्वज फडकविण्याची जबाबदारी आहे. रवी रेड्डी यांच्यासह सहा जणांना हे काम आलटूनपालटून दिले जाते. परंतु रवीचे म्हणणे असे की, मी हे काम आवडीने करतो. ते सांगतात, तिरंगा पहाटे झुंजुमुंजु होत (सूर्य उगवण्यापूर्वी) असताना फडकवला जातो. सूर्याची पहिली किरणे थेट तिरंग्यावर पडावी हा त्यामागचा उद्देश. त्यासाठी शिपायांची रात्रपाळी लावण्यात आलेली आहे. हा शिपाई तिरंगा सन्मानाने चढवितो. त्याच सन्मानाने उतरवितो.
रेड्डी सांगतात, तिरंगा फडकविताना, सलामी देताना छाती अभिमानाने फुलून येते. या तिरंग्यासाठी जवान सीमेवर लढत असतो. नेते मंडळी देशासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांनाही सहजासहजी हे भाग्य मिळत नाही; परंतु आम्हाला मात्र, ही संधी सहज उपलब्ध झाली आहे. ऊन, थंडी, वारा, पाऊस काहीही असो झेंडा फडकविण्याची वेळ आम्ही टळू देत नाही, असे सांगताना रवी रेड्डीच्या डोळ्यात आनंद मावत नाही. ते म्हणतात, पहाटे पहाटे जोरदार वारे सुटलेले असते. इमारतीवर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही अधिक असतो. तेव्हा झेंडा फडकावण्याचा अनुभव थरारक असतो. पडत्या पावसात चिंब होऊन झेंडा फडकावताना वेगळीच उभारी येते. लढणारे सैनिक आठवतात. राष्ट्रपती भवनासमोरून होणारी कडक परेड आठवते. देशसेवेची यापेक्षा चांगली संधी ती कोणती असेल.
रेड्डी म्हणाले, माझे सहकारी सय्यद अजहर, खान वासे महंमद, सुहास कुलकर्णी, विलास क्षीरसागर आणि उत्तम कुंभार या सर्वांनाच ध्वज संहितेचा उत्तम अभ्यास आहे. आम्हाला ध्वज संहिता खास शिकविण्यात आली. त्यात झेंड्याची गाठ महत्त्वाची. सोबतच वरच्या बाजूला कोणता रंग हवा, यावर भर दिला जातो. प्रशिक्षित कर्मचारी मग एकटाच झेंडा चढवतो व उतरवितो. सर्व राजशिष्टाचार पाळले जातात. पायातील पादत्राणे काढून, डोईवर टोपी ठेवून तिरंगा आम्ही फडकावतो. उतरवितो. राष्ट्रगीतही म्हणतो. शाळेतून बाहेर पडल्यानंतर यानिमित्ताने पुन्हा मागील ४ वर्षांपासून राष्ट्रगीत म्हणण्याचा योग असा आला आहे.

Web Title: One day to the leader, we are honored every day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.