एक कोटींची प्रशिक्षण संस्था
By Admin | Updated: January 24, 2017 23:38 IST2017-01-24T23:37:26+5:302017-01-24T23:38:12+5:30
बीड : ग्रामीण भागातील तरुण, महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी केंद्र शासन व स्टेट बँक आॅफ हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच १ कोटी रुपये खर्च करुन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

एक कोटींची प्रशिक्षण संस्था
बीड : ग्रामीण भागातील तरुण, महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी केंद्र शासन व स्टेट बँक आॅफ हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच १ कोटी रुपये खर्च करुन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शहराजवळील समनापूर शिवारात २ एकर जागा खरेदी करण्यात आली असून, या केंद्रामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळेल.
ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सध्या बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण, कर्ज मिळवून देण्यात येते. जिल्ह्यात १० हजाराहून अधिक बचतगट स्थापन असून, तीन हजार बचतगट सक्रिय आहेत. ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उभारल्या जात आहेत. बीडमध्ये प्रशिक्षण संस्थेचे काम जागेअभावी रखडले होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. सीईओ तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे अध्यक्ष नामदेव ननावरे, प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एम.पी. वाघमारे यांनी यासाठी पुढाकार घेऊन बीडजवळील समनापूर शिवारातील डोंगरमाथ्यावर २ एकर जागा निश्चित केली. या जागेच्या खरेदीला जिल्हाधिकारी राम यांनी तत्वत: मान्यता दिली असून, जागा खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आणखी ५० लाख रुपये प्राप्त होणार आहेत. दुमजली इमारतीत ग्रामीण भागाशी निगडित सर्व व्यवसायांचे प्रशिक्षण मिळणार आहे. (प्रतिनिधी)