जायकवाडीत २४ तासांत दीड टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:35 IST2017-09-18T00:35:39+5:302017-09-18T00:35:39+5:30
गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली

जायकवाडीत २४ तासांत दीड टीएमसी पाणी
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककडून येणाºया पाण्याचा ओघ वाढला आहे.गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरण ८६.५४ टक्के भरले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान पावसाने मोठी दडी मारल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आॅगस्ट महिनाअखेर अतिवृष्टी झाल्यामुळे जायकवाडीच्या पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली.
शनिवारी सकाळपर्यंत जायकवाडीमध्ये १८ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, धरणात ६६.३४ टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. विशेष म्हणजे जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण आवक ६३.८३ टीएमसी झालेली आहे. जायकवाडीने ९४ टक्के पातळी ओलांडल्यावरच विसर्ग करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे कडा कार्यालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.
‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांच्या संदर्भाने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. ते म्हणाले की, नाशिककडून प्रतिदिन ३५ ते ४० हजार क्युसेक पाण्याची आवक झाली तर जायकवाडीची पातळी झपाट्याने वाढून पाणी सोडण्याचा विचार करावा लागेल; मात्र सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू नाही. त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अजून कालावधी बाकी आहे.