२५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज

By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:20:24+5:302015-04-28T00:30:38+5:30

हणमंत गायकवाड , लातूर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़

In one of the 251 cases, the same person has twice the loan | २५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज

२५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज


हणमंत गायकवाड , लातूर
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़ आता तर २५१ प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे़ लाभार्थ्यांच्या जातीतही घोळ केला असून, एका प्रकरणात वेगळी तर दुसऱ्या प्रकरणात दुसरीच जात दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना प्रकरणनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़
भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली़ लातुरातही या महामंडळामार्फत २००२ पासून २०१४ पर्यंत हजारो लाभार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज वितरित करण्यात आले़ परंतु, वाटप करणारी यंत्रणा पारदर्शक नसल्याचे अनेक उदाहरणे घडले आहेत़ आता माहितीच्या अधिकारात २५१ प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ एकाच व्यक्तीची जातही वेगवेगळी दाखविली आहे़ धनादेश क्रमांकामध्ये व रक्कमेमध्ये फरकही आहे़ त्यातच कोणत्याही कर्ज प्रकरणाची वसुली झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे़
नरसिंग लक्ष्मण गायकवाड यांना लोदगा लातूरचा रहिवाशी दाखवून त्यांची जात जोशी दाखविली आहे़ त्यांना शेळी प्रकरणात शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे ४०१०६ धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ तर याच नावावर लोदगा औसा भोई जात दर्शवून शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे कर्ज ४०१०५ या धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ लातूर तालुक्यात लोदगा गाव नाही मात्र औसा तालुक्यात आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड नेमके कोणत्या गावचे, कोणत्या तालुक्याचे आणि कोणत्या गावचे हे स्पष्ट नाही़ माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत सामाजिक कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली़ मात्र महामंडळाकडून खुलासा झाली नाही़ त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़ एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज व जात वेगळी, गाव वेगळे दाखवून २५१ कर्ज प्रकरणात कर्ज वितरीत केलेल्या प्रकरणाची संख्या १४ असून, हा घोळ एकट्या लातूर कार्यालयातला आहे़
संशय असलेल्या २५१ प्रकरणात १४ कोटी ८० लाख रूपयांचे कर्ज वितरित झाले आहे़ या प्रकरणात ना वसुली ना लाभार्थ्यांचा ठावठिकाणा अशीच परिस्थितीच आहे़ मागे एकदा अस्तित्वात नसलेल्या आणि त्या गावाचा रहिवाशी नसलेल्या एका नावावर कर्ज वसुलीची नोटीस या महामंडळाने पाठविली होती़ संबंधित ग्रामपंचायतीने अशा नावाचा व्यक्ती आमच गावात राहत नाही, राहत नव्हता, मागे कधीही नव्हता असा खुलासा केल्यानंतरही महामंडळाने स्वत:चीच वाजवून घेत आमचेच खरे असल्याचा दावा केला होता़ आता या २५१ प्रकरणांतही एकाच नावाची दोन व्यक्ती असू शकतात, असा खुलासा महामंडळ करीत आहे. जातीच्या घोळाबाबत मात्र वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाने कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अपराध शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे.

Web Title: In one of the 251 cases, the same person has twice the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.