कांद्याने बळीराजाचा केला वांदा
By Admin | Updated: May 22, 2014 00:31 IST2014-05-22T00:27:39+5:302014-05-22T00:31:21+5:30
रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते.

कांद्याने बळीराजाचा केला वांदा
रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते. अधिच गारपिटीने झोडपलेल्या उत्पादकांना पुन्हा कांद्याने रडवले आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा दाखल होत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी नवा कांदा काढल्यानंतर त्याची साठवणूक न करता तो थेट विक्रीसाठी आणत आहे. नांदेडच्या बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत असल्यामुळे प्रतिक्विंटल दर ३०० ते ७०० रुपयावर आले आहेत. शेतकर्यांनी उत्पादनासाठी टाकलेला खर्च, वाहतुकीसाठी केलेला खर्च जास्त अन् उत्पादन कमी या तफावतीमुळे शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ६ रुपयापासून १२ रुपयापर्यंत आहेत. गतवर्षी कांद्याचे भाव प्रतिकिलो ६० ते ७० रुपयावर जाऊन ठेपले होते. परिणामी अनेक हॉटेल, भोजनालयातून कांदा हद्दपार झाला होता. दर कमी झाल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सर्वच भागात एकाच वेळी नवा कांदा काढणीस प्रारंभ झाल्याने भाव घसरत आहेत. केवळ चांगल्या प्रतीच्या कांद्यालाच ६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. ज्यावेळेस शेतकर्यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकर्यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागते. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणूक करण्यासाठी आधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो. एका एकरामध्ये ४० हजार रुपयाचे स्प्रिंक्लर बसविले असून बियाणे व इतर यासाठी ४२ हजार असा एकूण ८२ हजार रुपये खर्च केला. मात्र दर कमी झाल्याने यातून केवळ २० हजाराचे उत्पन्न मिळाले. यासाठी शासनाने शेतकर्यांना आधुनिक कांदाचाळ उभारणीसाठी सहाय्य करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया कळमनुरी तालुक्यातील झुंझुणवाडी येथील शेतकरी गोविंद जाधव यांनी दिली़ तर एका एकरात कांदा लागवडीसाठी मला १६ हजार रुपये खर्च झाला. तर उत्पन्न १२ हजार रुपये मिळाले. यातून कांद्यासाठी टाकलेला उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील शेतकरी भागोराव हाके यांनी सांगितले़