घरच्या बिलासाठीच ओम राजेंचे आंदोलन

By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T00:29:32+5:302014-07-01T01:05:15+5:30

उस्मानाबाद : नाफेडकडे थकलेल्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आ़ ओमराजे यांनी केलेले आंदोलन केवळ स्टंटबाजी होते़

Om Raje's movement for home bills | घरच्या बिलासाठीच ओम राजेंचे आंदोलन

घरच्या बिलासाठीच ओम राजेंचे आंदोलन

उस्मानाबाद : नाफेडकडे थकलेल्या शेतकऱ्यांच्या पैशासाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आ़ ओमराजे यांनी केलेले आंदोलन केवळ स्टंटबाजी होते़ झालेले आंदोलन हे केवळ घरचे आणि कार्यकर्त्याचे पैसे काढण्यासाठी करण्यात आल्याचे कागदपत्रांचा दाखला देत माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले़ शेतकऱ्यांचे पैसे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदारांनी हे आंदोलन करून स्टंटबाजी केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केले़
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी उद्भव योजनेचे बार्शीपर्यंत चाचणी झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी आंदोलनाची स्टंटबाजी केली होती़ त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे नाफेडकडे थकलेल्या पैशासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर स्टंटबाजीचे आंदोलन केले. आमदारांनी आंदोलनाचे पत्र दिले त्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी नाफेडकडून जवळपास दोन कोटी रूपये निधी कार्यालयास प्राप्त झाला होता़ त्यानंतर आंदोलनाची स्टंटबाजी करण्यात आली़ हरभरा घातलेल्या क्रमांकानुसार शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे गरजेचे होते़ मात्र, मे महिन्यात हरभरा घातलेल्या १६ जणांचा प्राधान्यक्रम डावलून स्वत:च्या कुटूंबातील सदस्यांसह कार्यकर्त्यांचे पैसे काढण्यात आले़ यात आमदारांच्या पत्नी संयोजनी ओमप्रकाश निंबाळकर व आमदारांच्या बंधूंच्या पत्नी देविका जयप्रकाश निंबाळकर यांच्या नावाचाही समावेश आहे. यात १ मे रोजी भिमराव कावळे, अंबऋषी क्षीरसागर, दिनेश डोके यांच्यासह एकूण १८ जणांनी हरभरा घातला होता़ मात्र, त्यातील केवळ देविका जयप्रकाश निंबाळकर व संयोजनी ओमप्रकाश निंबाळकर यांचे पेमेंट अदा करण्यात आले आहे़ त्यानंतर २ मे पासून २३ मे पर्यंत रामराव शिवराम शिंदे (क्ऱ३६१) यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी हरभरा घातला़ मात्र, २३ मे रोजी हरभरा घातलेले नितीन नेताजीराव भोसले (क्ऱ७२६) यांचे पेमेंट अदा करण्यात आले़ शेतकरी म्हणून स्थानिक आमदारांच्या घरची मंडळी आणि जवळच्या कार्यकर्त्यांना मिळालेले पैसे पाहता इतर शेकडो शेतकऱ्यांना का पेमेंट अदा करण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. १६ शेतकऱ्यांचे वजन मे महिन्यात झालेले असतानाही त्यांनी खासगी अडचणी सांगितल्याने पेमेंट दिल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे़ त्यामुळे आमदारांचे हे आंदोलन स्वत:चे पैसे काढण्यासाठी की शेतकऱ्यांसाठी होते असा प्रश्न पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम डावलला
नाफेडकडील शेतकऱ्यांचे पैसे मिळविण्यासाठी नाफेडच्या दिल्ली येथील कार्यालयासमोर आंदोलन करणे गरजेचे आहे़ मात्र, घरच्या मंडळींच्या व कार्यकर्त्यांच्या नावे घातलेल्या हरभऱ्याचे पैसे काढण्यासाठी फेडरेशनच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ आंदोलनाची स्टंटबाजी होत असल्याने दबावात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे तातडीने अदा केले. शेतकऱ्यांच्या पैशासाठी आंदोलन होते तर त्यांच्या अगोदर ते तुम्हाला कसे मिळाले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.
मी पैशाची मागणी केली नाही
माजी राज्यमंत्री पाटील यांच्या आरोपाबाबत आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, इतर शेतकऱ्यांप्रमाणे मीही हरभरा घातला आहे़ त्या पैशासाठी मी कोणतीही लेखी, तोंडी मागणी केलेली नाही़ केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे पैसे मिळावे, यासाठीच केले होते़ आंदोलनावेळी पाच कोटी रूपये देण्यात येतील, असे पत्र देण्यात आले आहे़ ते पैसे माझ्या घरी येणार नाहीत़ शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्यास यापुढेही आपण वेळोवेळी आंदोलन करू, असेही ते म्हणाले़

Web Title: Om Raje's movement for home bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.