ज्ञानमंदिरात ‘ओली पार्टी’
By Admin | Updated: April 30, 2016 00:09 IST2016-04-29T23:49:52+5:302016-04-30T00:09:59+5:30
वाळूज महानगर : ज्ञानमंदिर समजल्या जाणाऱ्या रांजणगाव जिल्हा परिषद शाळेतच शुक्रवारी भरदिवसा शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेला ‘ओल्या पार्टी’चा बेत जागरुक नागरिकांनी उधळून लावला.

ज्ञानमंदिरात ‘ओली पार्टी’
वाळूज महानगर : ज्ञानमंदिर समजल्या जाणाऱ्या रांजणगाव जिल्हा परिषद शाळेतच शुक्रवारी भरदिवसा शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेला ‘ओल्या पार्टी’चा बेत जागरुक नागरिकांनी उधळून लावला. या पार्टीची कुणकुण लागताच नागरिक शाळेत पोहोचताच तेथे ‘ताव’ मारण्यासाठी तयार असलेल्या या पदाधिकाऱ्यांनी पार्टीसाठी तयार केलेले अन्न फेकून देऊन शाळेतून धूम ठोकली. शाळेवर नियंत्रण ठेवण्याची, दर्जा सुधारण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनीच ज्ञानमंदिराचा असा गैरवापर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकारानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन पंचनामा केला. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सध्या शाळेला सुट्या लागलेल्या आहेत. सकाळी काही वेळेसाठी शिक्षक, इतर कर्मचारी शाळेत येतात. दुपारनंतर शाळा बंदच असतात. शाळेला सुटी असल्याची संधी साधून रांजणगाव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतच ओली पार्टी करण्याचा बेत आखला. सकाळी काही वेळ काम केल्यानंतर शिक्षक शाळेतून जाताच या पदाधिकाऱ्यांनी शाळा आपल्या ताब्यात घेतली. मग पार्टीसाठी या पदाधिकाऱ्यांनी चिकन, चपात्या, भात इ. स्वयंपाकही बनविला. पार्टीसाठी हजर असलेल्या काही जणांनी या ज्ञानमंदिरातच मनसोक्तमद्य प्राशन केले. जेवणावर ताव मारण्याच्या तयारीत हे सर्व जण होते. अन्न फेकून ठोकली धूम माहिती मिळताच जि. प. सदस्य अॅड. मनोहर गवई, उपसरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, सुभाष सोनवणे, दीपक बडे, संतोष लोहकरे, संजय तोगे, विजय तोगे, राजेंद्र उढाण, संतोष राऊत, संतोष निकम आदींनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. नागरिक येत असल्याचे नजरेस पडताच आत जेवणाच्या तयारीत असलेल्यांची चांगलीच भंबेरी उडाली. अन्न खिडकीतून बाहेर फेकून देऊन या पदाधिकाऱ्यांनी शाळेतून धूम ठोकली. शाळेच्या आवारात पार्टीसाठी तयार करण्यात आलेले अन्न, भांडी, पत्रावळ्या इ. साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. या प्रकारामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी गंगापूरच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक, मुख्याध्यापिका एस. एम. काझी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. हरिनाम सप्ताहामुळे लागली कुणकु ण एरवी या पदाधिकाऱ्यांना ही पार्टी ‘पचली’ असती; परंतु सध्या शाळेलगतच्या श्रीरामनगर या वसाहतीत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. शुक्रवारी सप्ताहाचा समारोप असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने शाळेजवळून ये-जा करीत होते. त्यामुळे ज्ञानमंदिरातील पार्टीचा हा गोंधळ काही भाविकांच्या नजरेस पडला. या भाविकांनी पार्टीची माहिती ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पंचनामा शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शाळेला भेट देऊन माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एस. एम. काझी आदींशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून घेतले. यावेळी उपस्थितांना शाळेच्या आवारात पार्टीसाठी तयार केलेले अन्न व साहित्य आढळले असून, याचा पंचनामाही करण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी दोन्ही मुख्याध्यापिकांची कानउघाडणी केली. शिक्षकांच्या माघारी घडलेला प्रकार याविषयी मुख्याध्यापिका एस. एम. काझी व मुख्याध्यापिका मीनाक्षी पाठक म्हणाल्या की, शाळेतील दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर आम्ही व शिक्षक दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घरी निघून गेलो. नंतर आमच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला. आता शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आपल्याला याबाबत काहीच माहीत नव्हते, असे म्हणत असले तरी शाळेच्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय ही पार्टी शक्य नाही, हेही तितकेच खरे आहे. कारण या पदाधिकाऱ्यांना पार्टीसाठी शाळा कुणी उघडून दिली? हा प्रश्न निर्माण होत आहे.