क्षुल्लक कारणावरून वृद्धाचा खून
By Admin | Updated: August 18, 2016 00:58 IST2016-08-18T00:31:46+5:302016-08-18T00:58:43+5:30
केज : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे गंगाधर महादबा अंजान (वय ७०) या वृद्धास मंगळवारी क्षुल्लक कारणावरुन भावकीतीलच लोकांनी मारहाण केली.

क्षुल्लक कारणावरून वृद्धाचा खून
केज : अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे गंगाधर महादबा अंजान (वय ७०) या वृद्धास मंगळवारी क्षुल्लक कारणावरुन भावकीतीलच लोकांनी मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला असून घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत गंगाधर अंजान यांना दोन मुले असून एक गावात तर एक अंबाजोगाईत राहतो. गंगधार हे गेल्या काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथे मुलाकडे रहायला गेले होेते. ते सोमवारी गावात परतले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता गावातीलच मृत्यूंजय पांडुरंग अंजान, दयानंद हरीपंडीत अंजान, अर्जून एकनाथ अंजान, स्वयंभू संजय अंजान, रघुनाथ किसन अंजान व स्वराजिस संजय अंजान हे गंगाधर यांच्या घरात घुसले. ‘तू गावात का राहायला आलास?’ अशी कुरापत काढून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंगाधर अंजान यांचा जागीच मृत्यू झाला. ते मृत्यूमुखी पडल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पोबारा केला. मयताचा मुलगा योगीराज गंगाधर अंजान यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला. घटना घडताच सहाही आरोपी फरार झाले आहेत. गावात तणावाचे वातावरण होते. बुधवारी सकाळी अंबाजोगाई येथील केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास सहायक निरीक्षक राहुल देशपांडे करत आहेत. (वार्ताहर)