पुरातन जलस्त्रोत पालिकेकडून दुर्लक्षित

By Admin | Updated: March 31, 2016 00:26 IST2016-03-31T00:21:08+5:302016-03-31T00:26:29+5:30

अजीत चंदनशिवे , तुळजापूर तीर्थक्षेत्र तुळजापूरला लाभलेला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मोठा आहे़ या शहरातील शिवकालीन, निजामकालीन विहिरी, जलकुंडांमुळे एकेकाळी अवघ्या शहरासह

Old water resources ignored by the corporation | पुरातन जलस्त्रोत पालिकेकडून दुर्लक्षित

पुरातन जलस्त्रोत पालिकेकडून दुर्लक्षित


अजीत चंदनशिवे , तुळजापूर
तीर्थक्षेत्र तुळजापूरला लाभलेला ऐतिहासिक, धार्मिक वारसा मोठा आहे़ या शहरातील शिवकालीन, निजामकालीन विहिरी, जलकुंडांमुळे एकेकाळी अवघ्या शहरासह भाविकांची तहान भागत होती़ मात्र, त्यानंतरच्या काळात या जलस्त्रोतांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत गेल्याने या जलस्त्रोतांची मोठी दूरवस्था झाली आहे़ पालिका प्रशासनाने तीन वर्षापूर्वी या जलस्त्रोतांची लाखो रूपये खर्च करून दुरूस्ती केली होती़ मात्र, याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा या ऐतिहासिक जलस्त्रोतांची अवस्था बिकट झाली आहे़
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील कमानवेस भागात तीन विहिरीत आहेत़ यात अहिल्याबाई होळकर ही विहीर त्या काळी भाविकांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली होती़ तसेच भगवती विहीर ही शहरातील नागरिकांची, भाविकांची तहान भागवित होती़ सध्या या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे़ तर अहिल्याबाई होळकर ही पुरातण विहीर कुलूपबंद ठेवण्यात आली आहे़
शहरातील साळुंखे गल्लीतील कोठाची विहीर ही गोड पाण्याची विहीर म्हणून सर्वत्र परिचित आहे़ निजामकाळात या विहिरीतील पाणी संपूर्ण शहरातील नागरिक वापरत होते़ या विहिरत परिसरातील नागरिकांनीच कचरा टाकल्याने ही विहीरही भरली आहे़ शुक्रवारपेठ मधील सोंजीबाच्या विहिरीची अवस्थाही अशीच झाली आहे़ सोंजीबाच्या विहिरीभोवताली काटेरी झुडपांनी विळखा घातला असून, या विहिरीत सध्या मुबलक पाणी आहे़ मंकावती गल्लीतील मंकावती विहीर ही बाहेरगावातून येणारे भाविक अंघोळीसाठी पाणी मिळावे म्हणून बांधण्यात आली होती़ या विहिरीचीही दूरवस्था झाली असून, या भागातील नागरिक येथे कचरा टाकत आहेत़ शहरातील सूर्यकुंड, चंद्रकुंड, रामकुंड हे डोंगराळ भागात असतानाही इथे पाणी उपलब्ध आहे़ मात्र, आत घाण पडल्याने या पाण्याचा वापर होताना दिसत नाही़ शिवाय घाटशीळ पायथ्याशी असलेला रामकुंडात मुबलक प्रमाणात पाणी आहे़ परंतू कुंडासोभोवताली मोठ-मोठी झाडे-झुडपे उगवली आहेत़ झाडांचा पाला-पाचोळा या कुंडात पडल्याने पाणी खराब झाले आहे़ हे कुंड निजामकाळात घाटशीळ मार्गे चालत येणाऱ्या भाविकांसाठी मोठा लाभदायी ठरत होते एकेकाळी शहरवासियांसह भाविकांची तहान भागविण्यात महत्त्वाचे ठरलेले शहरातील कोटाची विहीर, पिराची विहीर, सोंजीबाची विहीर, भगवती विहीर, अहिल्याबाई होळकर विहीर, लिंगाप्पा विहीर, मंकावती विहीर, गारीबनाथ विहीर, चंद्रकुंड, रामकुंडासह सूर्यकुंडाची मोठी दूरवस्था झाली आहे़ यात कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. सतत निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती पाहता पालिका प्रशासनाने या जलस्त्रोतांचे पूर्नरूजीवन करून त्याचे पुर्नभरण करणे आवश्यक आहे़ या सर्व पुरातन विहिरी, कुंडांचे पुर्नभरण झाले तर शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असून, केवळ दुरूस्ती करणे नव्हे तर याच्या देखभालीसाठीही ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़

Web Title: Old water resources ignored by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.