जुन्या वॉर्ड रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे गायब
By Admin | Updated: June 20, 2014 01:17 IST2014-06-20T01:10:06+5:302014-06-20T01:17:48+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ साली सापडत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

जुन्या वॉर्ड रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे गायब
औरंगाबाद : महापालिकेच्या २००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खुणा (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ साली सापडत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे २०११ ची जनगणना संशयास्पद आहे की, जुन्या वॉर्ड रचनांमध्ये लुडबूड झाली होती. यावरून पालिकेत खल सुरू आहे. १० वर्षांपूर्वी करण्यात आलेली वॉर्ड रचना ही मनपा सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच केली गेल्याचे यातून संकेत मिळत आहेत. एप्रिल-२०१५ मध्ये होणारी निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होणार असून, प्रभाग रचनेच्या नकाशाचे काम अंतिम टप्प्यात आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला.
जनगणनेआधारे जसे लोकसंख्येचे ब्लॉक आहेत. त्या आधारावर प्रभागांची रचना राहणार नाही. आयोगाने लोकसंख्येचे जे निकष दिले आहेत, त्यावर प्रभागांची रचना असेल. त्यासाठी वॉर्डांच्या विद्यमान हद्दींचा आधार घेतला जात आहे.
त्यातील अनेक वॉर्डांच्या हद्द खुणा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे २००५, २०१० साली झालेल्या निवडणुकांमध्ये मर्जीनुसार मतदार संख्या दुसऱ्या वॉर्डांमध्ये ऐनवेळी घुसविल्या गेली.
उपायुक्त किशोर बोर्डे आणि मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांच्यासह १६ कनिष्ठ अभियंत्यांची टीम जनगणनेतील प्रगणकांच्या लोकसंख्या मोजणीच्या माहितीनुसार प्रभागाचे नकाशे तयार करीत आहे.
१ जून २०१४ पर्यंत नकाशा ड्राफ्टिंगची माहिती निवडणूक आयोगाला पाठविण्याची डेडलाईन होती; पण ते काम अद्याप झालेले नाही.
१५ वॉर्डांच्या हद्दीची अडचण
नकाशाची जुळवणी करताना सुमारे १५ वॉर्डांच्या विद्यमान हद्दीतील खुणा गायब आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नकाशा तयार करताना कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.
जातीनिहाय मतदारांचा आकडा २०११ च्या जनगणनेनुसार निश्चित होणार आहे. त्या आकडेवारीनुसार शहरात १२ प्रभाग एस.सी., एस. टी. साठी आरक्षित होतील, असा अंदाज आहे. त्यात सहा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होतील.
१२ प्रभाग म्हणजे २४ वॉर्ड होऊ शकतात. सध्या एस. सी. साठी १७ व एस.टी.साठी १ वॉर्ड आहे. म्हणजेच आणखी ६ वॉर्ड वाढू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.