जुन्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांच्या नोंदीत घट !
By Admin | Updated: August 29, 2016 00:58 IST2016-08-29T00:47:12+5:302016-08-29T00:58:12+5:30
लातूर : जिल्हा पोलिस दलातील २३ व्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झाल्यानंतर गांधी चौक आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यांचा कामाचा भार हलका झाला आहे

जुन्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांच्या नोंदीत घट !
लातूर : जिल्हा पोलिस दलातील २३ व्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झाल्यानंतर गांधी चौक आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यांचा कामाचा भार हलका झाला आहे. या पोलिस ठाण्यांच्या क्राईम डायरीवर गत दोन आठवड्यांपासून किरकोळ गुन्ह्यांची नोंद मात्र अधिक वाढली आहे.
विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या निर्मितीनंतर गांधी चौक आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाचा आणि संवेदनशील भाग वगळण्यात आला असून, हा भाग विवेकानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यामुळे आता या पोलिस ठाण्याच्या डायारीतील गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लातूर ग्रामीण पोलिस आणि गांधी चौक पोलिस ठाण्याचा ५० टक्के भाग हा विवेकानंद चौक पोलिस ठाण्याला जोडण्यात आल्यामुळे गंभीर गुन्हे नोंदविण्याचे प्रमाणही वाढले आहे.
गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २८ नगरे आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गावे आणि २० नगरांचा नव्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. विवेकानंद चौक पोलिस ठाण्याला ५५ कर्मचाऱ्यांचे बळ देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)