मुलीला भेटण्यास गेलेली वृद्ध माता बेपत्ता
By Admin | Updated: November 12, 2014 00:24 IST2014-11-12T00:07:42+5:302014-11-12T00:24:40+5:30
जालना : मुलीला भेटण्यास गेलेली ८० वर्षीय वृद्ध माता अचानक गायब झाल्याची घटना देऊळगावराजा येथील बसस्थानकासमोर घडली.

मुलीला भेटण्यास गेलेली वृद्ध माता बेपत्ता
जालना : मुलीला भेटण्यास गेलेली ८० वर्षीय वृद्ध माता अचानक गायब झाल्याची घटना देऊळगावराजा येथील बसस्थानकासमोर घडली. मात्र या घटनेच्या दहा दिवसानंतरही अद्याप सदर मातेचा शोध लागलेला नाही.
जालना तालुक्यातील विरेगाव येथील गुंताबाई भीमराव मुळे व त्यांचे पती भीमराव मुळे हे २ नोव्हेंबर रोजी जालना मार्गे एस.टी. बसने देऊळगावराजा येथे गेले. तेथे त्यांची विवाहित मुलगी कांताबाई काळे यांचे घर आहे. दुपारी ३ वाजता दे.राजा बसस्थानकात पोहोचल्यानंतर भीमराव मुळे यांना तेथून जवळच असलेल्या सावखेड भोई या गावी काम असल्याने ते तिकडे गेले. तर बसस्थानकापासून मुलीचे घर जवळ असल्याने गुंताबाई तेथून पायी मुलीच्या घराकडे निघाल्या. परंतु घरी पोहोचल्याच नाहीत. मात्र नेहमीप्रमाणे गुंताबाई घरी पोहोचल्या असतील, असे मुळे परिवाराला वाटले. परंतु दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्याने दोन्हीकडील नातेवाईकांनी गुंताबाई यांचा शोध सुरू केला. त्यांचे चिरंजीव दिलीप मुळे यांनी देऊळगावराजा पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रारही नोंदविली. परंतु गुंताबाई यांचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही.