वयोवृद्ध मूर्तीकार मदतीपासून उपेक्षितच
By Admin | Updated: March 13, 2015 00:38 IST2015-03-13T00:24:30+5:302015-03-13T00:38:49+5:30
गजानन वानखडे , जालना सलग ५० वर्षांत आपल्या हातांनी विविध कलाकृतींची, देवदेवतांची मूर्ती तयार करून लोकांची दाद मिळविणारे कठोरा जैनपूर (ता. भोकरदन) येथील ८० वर्षीय

वयोवृद्ध मूर्तीकार मदतीपासून उपेक्षितच
गजानन वानखडे , जालना
सलग ५० वर्षांत आपल्या हातांनी विविध कलाकृतींची, देवदेवतांची मूर्ती तयार करून लोकांची दाद मिळविणारे कठोरा जैनपूर (ता. भोकरदन) येथील ८० वर्षीय वयोवृद्ध मूर्तीकार सुखलाल तानाजी नरवणे हे मात्र शासनाकडून वयोवृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनापासून वंचित आहेत.
सुखलाल यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्या विविध चित्रांनी लोकांशी प्रशंसा मिळविली. बेलदार समाजाचे असल्याने सुखलाल यांचे ज्येष्ठ बंधू सखाराम यांच्यासोबत गावोगावी जाऊन नागरिकांच्या घराचे बांधकाम करून देणे, खांबावर विविध कलाकृती, देवीदेवतांच्या मूर्ती तयार करण्याचे काम ते करत. दगडावर छन्नी हतोड्याने मूर्ती घडविण्याचे काम ते यातूनच शिकले. कोरीव कामातून त्यांनी अनेकविध मूर्ती साकारल्या आहेत.
याबाबत सुखलाल नरवणे म्हणाले की, १९६५ साली भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथे पहिल्यांदा दगडावर कोरीव काम करून महादेवाची पिंड मी तयार केली. खऱ्या अर्थाने येथूनच माझ्या कामाची सुरूवात झाली.
भोकरदन, परतूर, मंठा, बदनापूर आदी तालुक्यांतील जुन्या मंदिरांचे काम असो, अथवा जुन्या घरांचे दगडी बांधकाम, आपण अशी बरीच कामे केलेली आहेत.
बहुतांश मंदिरातील नंदी, गायमुख, खांबावरील विविध कोरीव काम, गावातील शनी महाराजांची गरूडावर बसलेली मूर्ती, चांदई ठोंबरी येथील नंदी, गोसेगाव भैरवाचे मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराचे कोरीव काम, परतूर तालुक्यातील नांगरतास मंदिराचे कोरीव काम, राजगुरू महाराजांची समाधी मंदिर, कोकरसा देवी मंदिर आदी मंदिरांच्या मूर्तीचे कोरीव कामे मी केली आहेत, असे त्यांनी सांगितले़
नरसिंह, मत्स्य, कच्छ, वराह, कुरमह, राम, परशुराम, हनुमान आदी दहा देवतांच्या मूर्ती देखील साकारल्या आहेत.
कुटुंबाचा उदरनिर्वाह याच कलेच्या आधारावर असल्याने सुखलाल हे प्रत्येकवेळी कलेल्या मोबदल्यात पैसे घेण्याऐवजी मिळेल ते अन्नधान्यही घेत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी एका मूर्तीचे काम करत असताना सुखलाल यांना अर्धांगवायूचा झटका आला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले आहेत. त्यामुळे वयाच्या ८० व्या वर्षी मूर्ती घडविण्याची इच्छा असली तरी ती घडविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.अशा प्रकारची कला त्यांच्या अंगी असून देखील हा कलावंत शासनाच्या मदतीपासून आदयापर्यंतही वंचितच आहे, ही अत्यंत खेदजनक आहे़