कादराबाद भागात जुनी इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:49 IST2017-09-11T00:49:38+5:302017-09-11T00:49:38+5:30
शहरातील कादराबाद भागातील जुनी इमारत शनिवारी रात्री कोसळली. पावसाचे पाणी इमारतीत मुरल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

कादराबाद भागात जुनी इमारत कोसळली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कादराबाद भागातील जुनी इमारत शनिवारी रात्री कोसळली. पावसाचे पाणी इमारतीत मुरल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे शहरातील शंभरहून अधिक धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कादराबाद भागातील उतारगल्लीमध्ये राम बुगदाने, विठ्ठल बुगदाने व मनोज बुगदाने यांची जुनी इमारत असून, बहुतांश भाग लाकडांपासून बनवलेला आहे. सदर इमारत मोडकळीस आल्याने बुगदाने कुटुंबीय काही महिन्यांपूर्वी दुसरीकडे वास्तव्यास गेले होते. जालना शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचे पाणी या जीर्ण इमारतीच्या भिंतीमध्ये मुरले. अगोदरच कमकुवत झालेली इमारत शनिवारी रात्री अचानक कोसळली. इमारतीला लागून उभी केलेली एक दुचाकी व सायकल माती व लाकडाच्या ढिगाºयाखाली दबली. इमारतीला लागून असलेल्या जुन्या मंदिराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जुना जालन्यातील कसबा, आनंदीस्वामी गल्ली, बाजार गल्ली, गणपती गल्ली, इंदरानगर भागातील बहुतांश इमारती मोडकळीस आल्या आहेत. या जुनाट इमारतींमधील लोकांच्या जीविताला धोका आहे. सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेला हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्याधिकाºयांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सहा झोन
नवीन जालना भागात एकूण सहा झोन असून, त्यापैकी सदर बाजार झोनमधील धोकादायक इमारतींचा सर्व्हे जूनमध्ये करण्यात आला आहे. या भागात एकूण ३६ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आल्यानंतर तसा अहवाल प्रभाग निरीक्षकांनी पालिकेला सादर केला आहे. पालिकेने या भागातील धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसाही बजावल्या आहेत.