कन्नड तालुक्यात तेलबिया उत्पादनाला घरघर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:36+5:302021-01-08T04:11:36+5:30
कन्नड : एकेकाळी तेलबिया उत्पादनात अग्रेसर असलेल्या कन्नड तालुक्यात आता मात्र तेलबिया उत्पादनाला घरघर लागली आहे. याचा परिणाम पारंपरिक ...

कन्नड तालुक्यात तेलबिया उत्पादनाला घरघर!
कन्नड : एकेकाळी तेलबिया उत्पादनात अग्रेसर असलेल्या कन्नड तालुक्यात आता मात्र तेलबिया उत्पादनाला घरघर लागली आहे. याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने चालणारे तेलघाणेही मोडीत निघाले आहेत. त्यामुळे तेलबिया उत्पादनाला शासनाने संरक्षण देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.
पूर्वी तालुक्यातील काळी भुई म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भागात रबी ज्वारीबरोबरच करडई, जवस या तेलबियांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते, तर खरीप हंगामात तीळ पिकाची पेरणी केली जात असे. खरीप हंगामात भुईमूग, सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते, तर बागायती क्षेत्रावर सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जात होते. काळ्या भुईत जमीन धारण क्षेत्र जास्त होते. त्यामुळे रबी हंगामात करडई, जवस या पिकांची स्वतंत्रपणे पेरणी केली जात होती. हे पीक कोरडवाहू जमिनीत चांगले येत होते. मात्र, हळूहळू या भागातील जमीन धारणक्षेत्र कमी कमी होत गेले आणि मग स्वतंत्र पद्धतीने पेरणी करण्यात येत असलेल्या तेलबियांची आंतरपीक म्हणून पेरणी होऊ लागली. तेलबिया पिकांची कमी उत्पादकता आणि तशात बाजारात मिळणारा भाव यामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने या भागांतून ही पिके हद्दपार होत आहेत, नव्हे अखेरची घटका मोजीत आहेत.
चौकट
शेतकरी नगदी पिकांकडे वळले
तालुक्यात बागायती क्षेत्रात सूर्यफुल आणि भुईमूग ही पिके घेतली जात होती. मात्र, या पिकांचा उत्पादन खर्च आणि उत्पादनापासून मिळणारे उत्पन्न यांच्यातील तफावत वाढत गेल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत. यामुळे तालुक्यात या पिकांच्या पेरणीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे.
चौकट
तेलबियांचे पेरणीक्षेत्र
तालुक्यात यावर्षी भुईमूग ८३१ हेक्टर, तीळ १२ हेक्टर, सोयाबीन ८०५ हेक्टर, तर सूर्यफूल ३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आले आहे. यामध्ये करडई मात्र हद्दपार झाल्याचे दिसत आहे.
कोट
तेलबियांना लागणारा उत्पादन खर्च व उत्पन्नापासून मिळणारा पैसा हे गणित तोट्याचे ठरू लागल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत. यामुळे तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी होत गेले आहे. मधमाश्यांची संख्याही घटल्याने सूर्यफुलाच्या परागीकरणाची समस्या निर्माण झाली असून, उत्पन्नात घट येत असल्याने सूर्यफूल लागवडही घटली आहे.
-बाळराजे मुळीक,
तालुका कृषी अधिकारी
( फोटो- बनशेंद्रा येथील काढणीस आलेले सूर्यफूल पीक.)