‘सुन रहा हैं ना तू...’ च्या हाकेने भारला आसमंत!

By Admin | Updated: October 9, 2014 00:50 IST2014-10-09T00:35:50+5:302014-10-09T00:50:55+5:30

औरंगाबाद : समोरच्या गर्दीला कुणाच्या तरी आगमनाची उत्कंठा लागली होती...

'Oh listening, you do not ...' | ‘सुन रहा हैं ना तू...’ च्या हाकेने भारला आसमंत!

‘सुन रहा हैं ना तू...’ च्या हाकेने भारला आसमंत!

औरंगाबाद : सप्तरंगांनी उजळलेला भव्य मंच... भरात आलेली वाद्यवृंदरचना... आकाशात उजळलेला कोजागरीचा पूर्ण चंद्र आणि धुंद करणारे उल्हासित वातावरण. मात्र, या उत्सवातही समोरच्या गर्दीला कुणाच्या तरी आगमनाची उत्कंठा लागली होती... प्रत्येक जण गुणगुणत होता ‘सुन रहा हैं ना तू...’
...आणि औरंगाबादकरांच्या काळजाच्या या हाकेला ‘ओ’ देत अखेर तमाम तरुणांचा आवडता गायक अंकित तिवारी मंचावर अवतरला! पांढरा शर्ट, काळी जीन्स आणि गडद निळे मखमली जॅकीट घातलेल्या अंकितची मोहक छबी दिसताच रसिकांनी एकच जल्लोष केला. प्रोझोन मॉलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘अंकित तिवारी लाईव्ह’ या मैफलीत ‘आशिकी-२’फेम अंकितने आबालवृद्धांना अक्षरश: आपल्या तालावर नाचविले.
लोकमत मीडिया आणि प्रोझोन मॉलचा संयुक्त उपक्रम असलेल्या या मैफलीसाठी सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्यासह सखी मंच व युवा नेक्स्टचे सदस्यही आवर्जून उपस्थित होते. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकालाही अविरत स्वागतशील सेवा देणाऱ्या प्रोझोन मॉलचे संचालक अनिल इरावने यावेळी प्रत्येकाचे स्वागत करीत होते. ग्राहकांना हे ठिकाण केवळ खरेदीची एक जागा न वाटता निखळ मनोरंजनासाठीही हक्काची जागा वाटावी यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सध्या मॉलला महिन्याला सहा लाख ग्राहक भेट देत असून, येत्या काळात हा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मैफलीच्या सुरुवातीस चित्रपटसृष्टीतील स्टार गायिका असलेल्या सुकृती आणि आकृती ठक्कर या दोन जुळ्या बहिणींनी ‘मोरा सैया मोसे बोले ना...’ हे शास्त्रीय बांधणीतील गाणे समरसून सादर केले. ‘मैं तेणू समझावां जी...’ आणि ‘इस दिल का मंै क्या करूं’ या त्यांच्या गीतांनाही दाद मिळाली. यानंतर रेडिओ मिर्चीची आर.जे. मोना हिने रसिकांशी अवखळ शैलीत संवाद साधत धमाल आणली. आपल्या आवडत्या गायकासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या रसिकांना तिने आवाहन केले, ‘गायक अंकितला बोलवायचे आहे ना? मग गा... गाण्यातून त्याला साद घाला... तुमचा आवाज पोहोचला त्याच्यापर्यंत, तर नक्की येईल तो!’ यावर रसिकांनीही उस्फूर्तपणे ‘सुन रहा हैं ना तू...’ या त्याच्याच शब्दांत त्याला सामूहिक साद घातली.
आणि खरोखरच अंकित सामोरा आला तोसुद्धा ‘सुन रहा हूँ मैं...’ गातच! ‘जरा सी दिल में दे जगह...’ अशा आर्जवी स्वरात त्याने रसिकांना या स्वरयात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. ‘आशिकी-२’मधून मनामनात सुरेल जागा मिळविलेल्या अंकितच्या सुरात सूर मिसळत सर्व रसिकांनीही गाणी गायली. ‘सुन रहा हैं ना तू...’च्या शेवटी टिपेला पोहोचलेल्या त्याच्या सुराने उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. मैफील संपल्यानंतरही सभोवताली भरून उरलेले सूर रसिकांच्या मनात दरवळत राहिले. औरंगाबाद शहरातील विशेषत: युवा रसिकांच्या हा कार्यक्रम दीर्घ काळ लक्षात राहील.
गीत आधी अनेकांनी नाकारले होते; पण नंतर त्याच गीताने ओळख दिली...
सत्य आणि विचारामुळे व्यक्ती जोडली जाते. चांगल्या गोष्टी लोकांना आवडतात हा अनुभव मला आला आहे. ‘सुन रहा हैं ना तू’ हे गीत ‘आशिकी-२’मध्ये गाण्यापूर्वी मी अनेकांना ऐकविले होते. त्यांनी ते नाकारले; पण याच गीताने मला ओळख मिळवून दिली, असे गायक अंकित तिवारी याने पत्रकारांनी बोलताना सांगितले.
शहरात आल्यानंतर अंकित तिवारीने पत्रकारांशी संवाद साधला. ‘आशिकी-२’च्या एक वर्षापूर्वी मी ‘सुन रहा हैं ना तू’ हे गीत अनेकांसमोर सादर केले होते. आज तेच गीत माझी ओळख बनले आहे. काही लोकांना न आवडणारी एखादी गोष्ट अथवा कलाकृती इतरांना आवडते हा संदेश त्याने दिला. गीतांसाठी शब्दही महत्त्वाचे असतात. शब्दांमुळे गीत अधिक चांगले होते. यापुढे वेगवेगळ्या प्रकारची गीते गाणार आहे. ‘पीके’, ‘रॉय’, ‘एक्स’ आणि ‘बेबी’ या चित्रपटात गीते गायली आहेत. अजय-अतुल यांना भेटण्याची इच्छाही अंकितने व्यक्त केली.

Web Title: 'Oh listening, you do not ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.