अधिकाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
By Admin | Updated: September 30, 2014 01:26 IST2014-09-30T00:07:17+5:302014-09-30T01:26:44+5:30
अहमदपूर : ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियानची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘मिशन स्वच्छता भारत’ हा नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून,

अधिकाऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
अहमदपूर : ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियानची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘मिशन स्वच्छता भारत’ हा नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्याअंतर्गत शनिवारी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नितीन दाताळ यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेची शपथ दिली.
यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी एस.एन. मांजरमकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी दाताळ म्हणाले, निर्मल भारत अभियानांतर्गत तालुकास्तरावर स्वच्छतेच्या अनुषंगाने कार्य केले जात आहे. प्रत्येकाने दररोज किमान पाच गृहभेटी देऊन सर्वच कुटुंबांना स्वच्छताविषयक संदेश देणे आवश्यक आहे. हे संपर्क अभियान वीस दिवस राबविण्यात येणार आहे. तसेच निर्मल भारत अभियानला गती देण्यासाठी निर्मल कार्यालय अभियान राबवून तालुकास्तरीय सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छतागृह उपलब्धता, देखभाल दुरुस्ती व महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्धतेसंदर्भात मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व तालुक्यातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेविषयकशपथ देऊन घरोघरी जाऊन स्वच्छतागृह बांधकाम व वापराविषयी चालता-बोलता स्वच्छ घर व स्वच्छ परिसर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे यात महिलांचा सहभाग वाढणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
शाळा, अंगणवाडीस्तरावर मुला-मुलींसाठी योग्य प्रमाणात शौचालय उपलब्धता, देखभाल दुरुस्ती तसेच निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेण्यात येऊन हात धुण्याचे महत्व व स्वच्छतेचे सहा संदेश देण्यात येणार आहेत. तसेच घरातील, गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी, साठवण या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
४या उपक्रमात बचत गट, युवक मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, सामाजिक संघटना यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.