अधिकारीही आता खेड्यात मुक्कामाला
By Admin | Updated: June 16, 2014 00:13 IST2014-06-15T23:55:47+5:302014-06-16T00:13:06+5:30
पाथरी : जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करून जनतेशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात असतानाच

अधिकारीही आता खेड्यात मुक्कामाला
पाथरी : जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करून जनतेशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात असतानाच आता तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस तालुक्यातील एका खेड्यामध्ये मुक्काम करावा लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी नुकतेच काढले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेशी प्रशासनाचा सुसंवाद साधला जावा, नागरिकांच्या समस्या सुटाव्यात या उद्देशाने जिल्हाभरामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एका गावात जनसंवाद कार्यक्रम गावात मुक्कामी राहून करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. समस्यांचे निराकरण होतानाही दिसून येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या या जनसंपर्क अभियानानंतर आता तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना आठवड्याच्या मुक्कामी राहण्याच्या गावचे आता नियोजन करावे लागणार आहे. प्रशासनाने हा कार्यक्रम हाती घेतला असला तरी यासाठी तालुकास्तरावरून अधिकारी आणि जनतेचा किती प्रतिसाद मिळतो? यावरच या नवीन अभियानाचे यश अवलंबून आहे. (वार्ताहर)
नागरिकांची अरेरावी
प्रशासनाने जिल्हाभरातील खेड्यांमध्ये अधिकारी जनतेशी संवाद साधण्यासाठी मुक्काम करीत आहेत. नागरिकांसोबत चर्चाही केली जात आहे, असे असतानाही काही हौशा नागरिकांकडून मात्र अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी अरेरावी केली जात असल्याचे प्रकारही निदर्शनात येत आहे.