अधिकाऱ्यांची कार्यालयाला दांडी !
By Admin | Updated: September 2, 2014 01:52 IST2014-09-02T00:39:32+5:302014-09-02T01:52:19+5:30
लातूर : प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील बहुतांश अधिकारी गैरहजर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत उघडकीस आले आहे़

अधिकाऱ्यांची कार्यालयाला दांडी !
लातूर : प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील बहुतांश अधिकारी गैरहजर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत उघडकीस आले आहे़ सोमवारी सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रशासकीय इमारतीतील १८ कार्यालयाला अचानक भेट दिली़ मात्र यावेळी दोन अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य कार्यालय प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे़
कार्यालयात कर्मचारी वेळेवर येतात़ त्यांना बायोमॅट्रीक प्राणाली बंधनकारक आहे़ कार्यालयात आल्यानंतर त्यांना थंब करावा लागतो़ पण अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन नाही़ त्यांना बायोमॅट्रीक प्राणालीही नाही़ त्यामुळे मनात येईल तेव्हा ते कार्यालयात येतात. ही बाब नुतन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या कानावर गेली़ त्यामुळे त्यांनी सोमवारी अचानक प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला़ सकाळी १०़३० वाजता जिल्हा कोषागार अधिकारी, सहनिबंधक सहकारी संस्था, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-२, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी, जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी, सहय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, भुमीअभिलेख जिल्हा अधीक्षक, सामाजिक वनीकरण उपसंचालक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, भूकंप पुर्नवसन विभागाचे कार्यकारी अभियंता आदी कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली़
उपविभागीय कृषी अधिकारी डॉ़ तुकाराम मोटे, उपविभागीय सहनिबंधक गोहत्रे यांचा अपवाद वगळता कार्यालय प्रमुख गैरहजर होते़ (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांत योग्य तो खुलासा करा, अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल. आपण १ सप्टेंबर रोजी आपल्या कार्यालयात सकाळी १०.३० वाजता हजर नव्हता. त्याचा योग्य खुलासा न आल्यास कारवाई केली जाईल, असे या नोटिशीत जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्हा कोषागार, सहाय्यक निबंधक, जिल्हा दुग्ध व्यवसाय, जिल्हा लेखापरीक्षक, जिल्हा महिला व बालकल्याण तसेच लघु पाटबंधारे आदी कार्यालयांत सर्वसामान्यांची कामे असतात. परंतु, अधिकारीच कार्यालयात राहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाला व्यत्यय येतो. कार्यालयात अधिकारी नसणे नेहमीचेच झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे तक्रार आली होती. या तक्रारीची खात्री करून घेण्यासाठी सोमवारी सकाळी १०.३० वाजता तपासणी राऊंड घेतला असता १८ अधिकाऱ्यांचा वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा असल्याचे उघडकीस आले आहे.