तयारी नसल्याने अधिकारी तोंडघशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:01 IST2017-10-04T01:01:02+5:302017-10-04T01:01:02+5:30
शहरात सुरू असलेली विकास कामे, मालमत्तांशी निगडित प्रकरणे, कर वसुली, शासन योजनांची अंमलबजावणी याबाबतची कुठलीच माहिती अद्ययावत नसल्याने नगर पालिकेचे अधिकारी सर्वसाधारण सभेत तोंडघशी पडले

तयारी नसल्याने अधिकारी तोंडघशी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात सुरू असलेली विकास कामे, मालमत्तांशी निगडित प्रकरणे, कर वसुली, शासन योजनांची अंमलबजावणी याबाबतची कुठलीच माहिती अद्ययावत नसल्याने नगर पालिकेचे अधिकारी सर्वसाधारण सभेत तोंडघशी पडले. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्याधिका-यांना माहिती घेऊन सांगतो, पुढील बैठकीत नक्की माहिती देतो, असा मोघम खुलासा करत वेळ मारून न्यावी लागली. यामुळे पालिका सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिका-यांनी कामचुकार अधिका-यांच्या बदल्या करण्याची मागणी सदस्यांनी केली.
जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पालिका सदस्यांसह अधिकाºयांची सभागृहात उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीलाच महावीर ढक्का यांनी महात्मा फुले मार्केट, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, जवाहर बाग, आझाद मैदान परिसरात बीओटी तत्त्वावर झालेली बांधकामे व हस्तांतरित केलेल्या गाळ्यांबाबत माहिती विचारली. संबंधित विभागाच्या अधिका-याने संचिका उपलब्ध नसल्याचे सांगून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा खुलासा केला तर पालिकेच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात ३२ वकील कार्यरत असल्याचे मुख्याधिका-यांनी सांगितले. नियुक्त वकीलच पालिकेच्या मालमत्ता दुस-याच्या घशात घालत असल्याचा आरोप ढक्का यांनी केला. कर विभागाचे प्रेम भारती यांनी जिंदल मार्केटमध्ये ५७५ गाळे असताना २५० गाळ्यांनाच कर आकारून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ढक्का यांनी केला, यावर खुलासा देताना संबंधित अधिका-याने, भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईल, असे सभागृहात सांगितल्याने अन्य सदस्यांनी भारती यांना निलंबित करण्याची मागणी केली.
विजय चौधरी यांनी बंद पथदिव्यांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी राजकीय पदाधिकारी, जिल्हाधिकारी, महावितरण, पालिका सदस्य व अधिकाºयांची बैठक घेण्याची मागणी केली. स्वच्छतेच्या मुद्यावर सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आपल्या प्रभागात चार दिवसांत स्वच्छता न झाल्यास सर्व कचरा मुख्याधिका-यांच्या दालनात आणून टाकला जाईल, असे सदस्य विष्णू पाचफुले मुख्याधिका-यांना उद्देशून म्हणाले. तर शहरातील कचरा उचलण्याऐवजी बिले उचलण्याचे काम जोरात सुरू असल्याचे जगदीश भरतिया यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅक्टरसाठी ६० लाखांचे बिल देण्याऐवजी पालिकेने ५२ लाख रुपये खर्चून स्वत:ची दहा ट्रॅक्टर खरेदी करावी, या मुद्याकडे भरतिया यांनी लक्ष वेधले. अंतर्गत जलवाहिनीच्या आराखड्यात मंजूर नऊ पाण्याच्या टाक्यांचे काम कधी पूर्ण होईल, याचा खुलासा करण्याची मागणी आरेफ खान, हरिश देवावाले, रमेश गौरक्षक यांनी केली. पालिकेकडे सक्षम अभियंत्यांची संख्या कमी असून सक्षम अधिकारी नसल्याने कामे प्रलंबित राहत आहेत. सभागृहाने सदर काम बांधकाम विभाग किंवा जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा ठराव घ्यावा, असे मुख्याधिकाºयांनी सांगितल्यामुळे सदस्य आणखी आक्रमक झाले. नजीब लोहार, श्रीकांत पांगारकर यांनी शहर स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत कामचुकारपणा करणाºया सफाई कामगारांची दुस-या प्रभागात बदली करण्याची मागणी केली. अंतर्गत जलवाहिनीच्या कामात सहा इंचाऐवजी चार इंच जाडीचा पाईप टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असताना २४ कोटींचे बिल दिले कसे, यावर आक्षेप घेतला. शशिकांत घुगे, विजय पवार, विनोद रत्नपारखे, संध्या देठे, वैशाली जांगडे, रेणुका निकम, शेख शकील, छाया वाघमारे या सदस्यांनीही उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्याधिका-यांसह अधिका-यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. २०१७-१८ या वर्षाकरिता वार्षिक करार करण्याच्या ठरावाला विरोध असल्याचे भाजप सदस्यांनी सभागृहात सांगितले. शेवटी गोंधळातच चौदा ठराव मंजूर करण्यात आले.