अधिकारी ‘मस्त’ अन् खेळाडू ‘त्रस्त’!
By Admin | Updated: March 13, 2015 00:41 IST2015-03-13T00:29:01+5:302015-03-13T00:41:54+5:30
महेश पाळणे , लातूर कुठलाही खेळ म्हटले की, मैदान आलेच़ खेळाडूही मैदानाला आपले मंदिर समजतात़ मात्र क्रीडा संकुलातील या खेळाडुंचा देवच गाभाऱ्यातून निघून गेला आहे़

अधिकारी ‘मस्त’ अन् खेळाडू ‘त्रस्त’!
महेश पाळणे , लातूर
कुठलाही खेळ म्हटले की, मैदान आलेच़ खेळाडूही मैदानाला आपले मंदिर समजतात़ मात्र क्रीडा संकुलातील या खेळाडुंचा देवच गाभाऱ्यातून निघून गेला आहे़ त्याचे मुख्य कारण म्हणजे मैदानाची झालेली दुर्दशा़ यामुळे कबड्डी, खो-खोसह व्हॉलीबॉलपटुंना निकृष्ट मैदानावर आपला दैनंदिन सराव करावा लागत आहे़
प्रशासनाच्या टोलवाटोलवीत क्रीडा संकुलातील क्रीडांगणाचे पुरते हाल झाले आहेत़ ६० लाखांचा निधी सांर्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुनही कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलची मैदाने दुर्लक्षीतच आहेत़ तर दुसरीकडे दस्तुरखुद्द क्रीडाधिकारीच उत्तम आसनव्यवस्थेसह एसीत थंड हवेचा आनंद घेत आहेत़ खेळाचा आत्मा असलेले संकुलातील मैदाने मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या अभावाने गुदमरुन जात आहेत. जानेवारी २०१४ मध्ये क्रीडा कार्यालयाने ४० लाख रुपये सा़बां़ विभागाकडे वर्ग केले़ यातूनच बास्केटबॉलच्या मैदानासह क्रीडा कार्यालयातील फर्निचरच्या कामासह काही मैदानातील तारेचे कुंपण बांधण्यासाठी खर्च करण्यात आले़ निधी अपुरा असल्याचे सांगत पुन्हा सा़बां़ विभागाकडे २० लाख नोव्हेंबर २०१४ मध्ये वर्ग करण्यात आले़ यानंतरही मैदान दुरुस्तीचे काम झाले नाही़ ई-टेंडरिंगचे कारण दाखवत अद्यापही काम गुलदस्त्यातच आहे़ त्यातच क्रीडा खात्याने यंदाच्या वर्षातील काही खेळांच्या स्पर्धा खाजगी मैदानाच्या कुबड्या घेत पार पाडल्या. जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी लातूरचे नाव रोशन केले आहे़ मराठवाड्यातही लातूरचे क्रीडा संकुल प्रसिद्ध आहे़ मैदानाचे हाल झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडूंच्या समस्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सध्या तरी क्रीडा अधिकारी तुपाशी अन् खेळाडू उपाशी अशी अवस्था लातूरच्या क्रीडा क्षेत्राची झाली आहे़
व्हॉलीबॉलच्या मैदानावर बारीक खडी असल्याने नित्यनियमाने सकाळ- संध्याकाळच्या सत्रात सराव करणाऱ्या खेळाडुंचे बेहाल होऊन त्यांचे पाय घसरत आहेत़ कबड्डीच्या मैदानावर असलेली मोठी खडी तर या मैदानाचे वास्तव्य दाखवत आहे़ खो-खो खेळाचेही हाल न सांगितलेलेच बरे, अशी अवस्था सध्या या तिन्ही मैदानाची झाली आहे़ काही दिवसांपूर्वी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली होती़ यामुळे खेळाडुंमध्ये आशेचा किरण जागृत झाला होता़ मात्र तोही मावळल्याने खेळाडूंतून नाराजीचा सूर उमटत आहे.