अधिकाऱ्यांचे रडगाणे !
By Admin | Updated: July 14, 2016 01:14 IST2016-07-14T00:13:33+5:302016-07-14T01:14:44+5:30
बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली.

अधिकाऱ्यांचे रडगाणे !
बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मी पाहते, तुम्ही कामे वेगाने करा, असे खडसावले.
आ. आर. टी. देशमुख, आ. प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, रेल्वे अधिकारी धांडोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत खा. मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदनगर ते बीड दरम्यान भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले आहे. रूळ टाकण्याचे कामही सुरू आहे. मात्र, दुसरीकडे बीड ते परळी दरम्यानच्या रेल्वे कामासाठी भूसंपादनही झालेले नाही, असा मुद्दा आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यानंतर खा. मुंडे म्हणाल्या, बीड ते परळी रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवा. केंद्र सरकारकडून भूसंपादनासाठी १५८ कोटी रूपये आले आहेत. हा सर्व निधी भूसंपादनासाठीच वापरावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
धानोरा रोड येथे रेल्वेस्थानक उभारण्याचे काम सुरू आहे का ? अशी विचारणा खा. मुंडे यांनी केली. त्यावर पूर्वी बार्शी नाका येथील प्रस्ताव होता. मात्र, नंतर धानोरा रोड निश्चित झाल्यानंतर तेथील भूसंपादनाचे काम सुरू आहे, असा खुलासा अधिकाऱ्यांनी दिला. त्यालाही विरोध होत असल्याचा मुद्दा एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. त्यावर रेल्वेस्थानक कोठे हवे ? हे ठरेल पण त्यासाठी रेल्वे मार्गाचे काम अडकवून ठेवू नका, असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारकडून गतवर्षी १९२ कोटी रुपये भूसंपादनासाठी आले होते. त्यापैकी १३ कोटी रूपये शिल्लक आहेत. राज्य शासनाने ५० टक्के वाट्याचा निधी दोन वर्षांपासून दिला नाही, अशी कैफियतही अधिकाऱ्यांनी मांडली. मी निधी आणते, मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना देते. तुम्ही कामे वेगाने करा, अशा सूचना खा. मुंडे यांनी दिल्या.
रेल्वे कामासाठी दिरंगाई करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (प्रतिनिधी)
बीडच्या रेल्वेचा प्रश्न स्वातंत्र्यप्राप्तीपासून प्रलंबित आहे. बीडकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून, त्याचे नियंत्रण दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयातून सुरू आहे.
४त्यामुळे पंतप्रधान रेल्वेच्या कामाबाबत केव्हाही विचारू शकतात. तेव्हा तुमच्याकडे उत्तर हवे. तुम्हाला थेट पंतप्रधानांना उत्तरे द्यावयाची आहेत, एवढे लक्षात ठेवा, अशी तंबीही यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली.
४रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना बीडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेण्यास भाग पाडण्यात येईल. त्याशिवाय कामाला गती येणार नाही, असे खा. मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
४भूसंपादनाच्या नव्या कायद्यामुळे काही ठिकाणी भूसंपादनास अडथळे येत आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.