अधिकारी-कंत्राटदारांंची ‘रोहयोमध्ये लॉबींग ?’
By Admin | Updated: May 13, 2015 00:26 IST2015-05-13T00:23:04+5:302015-05-13T00:26:23+5:30
कळंब : कळंब तालुक्यामध्ये मग्रारोहयोंतर्गत पंचायत समिती स्तरावर तब्बल १७६ कामे चालू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

अधिकारी-कंत्राटदारांंची ‘रोहयोमध्ये लॉबींग ?’
कळंब : कळंब तालुक्यामध्ये मग्रारोहयोंतर्गत पंचायत समिती स्तरावर तब्बल १७६ कामे चालू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. वैयक्तिक लाभाच्या कामांवर काही तुरळक मजुरांची उपस्थिती असताना पं.स. प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता ही कामे सुरु दाखविली कशी? असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.
कळंब पं.स. अंतर्गत ग्रामपंचायतमार्फत सध्या विहिरी, जनावरांचे गोठे, शोषखड्डा या वैयक्तिक लाभाच्या कामांवर मजुरांची उपस्थिती दाखविली जात आहे. या कामांवर अत्यंत तुरळक प्रमाणात मजुरांची उपस्थिती असताना मजुरांची उपस्थिती वाढवून दाखविली जात आहे.
याव्यतिरिक्त पं.स. मार्फत उमरा, मस्सा (खं), एकुरका, हावरगाव, लासरा, हसेगाव (के), मोहा, तांदुळवाडी, आंदोरा, गौर, उपळाई या गावशिवारामध्ये साईडपट्ट्या अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड, सिमेंट नाला बांध या कामांवर मजुरांची उपस्थिती असल्याचीही नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कामांवर मजुरांची उपस्थिती नसतानाही त्यांचे हजेरीपत्रके ग्रा.पं. मार्फत पं.स. कडे सादर केली जात असल्याची धक्कादायक माहिती आली आहे. याप्रकारची २० कामे चालू असल्याचा अहवाल पं.स. कडे आहे. या कामांवर जवळपास ५०० ते ६०० मजूर उपस्थित दाखविले आहेत. परंतु हा आकडाही खोटा असल्याचे समोर येत आहे.
वर्षानुवर्षे कळंब पं.स. मध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांच्या साटेलोट्यामुळे मग्रारोहयो योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे. या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली होत नसल्याने व झाली तरीही राजकीय हस्तक्षेपाने ती टाळली जात असल्याने मग्रारोहयोच्या माध्यमातून पैशाची मोठी उलाढाल होत आहे. या कर्मचाऱ्यांची बदली केल्यास मग्रारोहयोचे चित्र बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
या कामांवर यंत्राचा सर्रास वापर केला जातो आहे. मजुरांची नावे केवळ हजेरी पत्रकावर दाखविली जातात. परंतु सर्व कामे यंत्रानेच आटोपली जात आहेत. मजुरांना कामे द्या, असा टाहो फोडणारे गावपुढारीही रात्रीतून यंत्राद्वारे कामे उरकून घेत असल्याने मजुरांची उपासमार कमी होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. विहिर, शोषखड्डे हे वैयक्तिक लाभाचे बहुतांशी कामेही आता यंत्राद्वारेच पार पडत आहेत.