अधिकारी तुपाशी; कर्मचारी उपाशी..!

By Admin | Updated: July 12, 2016 00:55 IST2016-07-12T00:42:31+5:302016-07-12T00:55:50+5:30

आशपाक पठाण , लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वर्षभरापूर्वी आॅनलाईन वेतन सुरू झाले असले तरी याचा लाभ केवळ अधिकाऱ्यांनाच झाला असून कर्मचाऱ्यांना

Officer Tippashi; Employee hungry ..! | अधिकारी तुपाशी; कर्मचारी उपाशी..!

अधिकारी तुपाशी; कर्मचारी उपाशी..!


आशपाक पठाण , लातूर
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वर्षभरापूर्वी आॅनलाईन वेतन सुरू झाले असले तरी याचा लाभ केवळ अधिकाऱ्यांनाच झाला असून कर्मचाऱ्यांना मात्र दरमहा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे़ ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन निघाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे़ धड कर्जही मिळेना अन् पगारही यातून कुचंबना वाढल्याचे कर्मचाऱ्यांतून सांगितले जात आहे़
लातूर जिल्ह्यात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ६०० कर्मचारी विविध संवर्गात कार्यरत आहेत़ ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वर्षभरापासून वेळेत होत नसल्याने विविध समस्यांना कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे़ जून महिन्यांत विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालयाचे प्रवेशसुध्दा काही कर्मचाऱ्यांना उसनवारीवर करावे लागले आहे़ एप्रिल, मे व जून तीन महिन्यांचे वेतन जुलैचा पंधरवाडा संपत आला तरीही मिळाले नाही़ हा प्रकार कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन राहिला नसला तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा वेळेत होते़ मात्र, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लिपीक, कारकून, औषध वितरक यांचे हाल सुरू आहेत़ वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे़ कर्मचाऱ्यांनी ओरड केल्यावरही वरिष्ठांनी यात सुसुत्रता आणली नसल्याचा आरोप केला जात आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्रातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे बील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या लेखा विभागाकडे पाठविल्यानंतर वेळेत वेतन देण्याची जबाबदारी असताना दोन ते तीन महिने वेतनच जमा होत नसल्याने नाहक बँकेत चकरा मारण्याची वेळ कर्मचाऱ्यांना आली आहे़
एप्रिल महिन्यांत वेतन झाले नसल्याने मुलांचे शाळा प्रवेश, गृह कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मित्राकडून महिनाभरासाठी उसनवारीने २० हजार रूपये घेतले़ दोन महिने झाले तरी वेतनच झाले नसल्याने त्याचे पैसे परत करता आले नाहीत़ त्याला विश्वासही येईना झाला आहे, अधिकाऱ्यांकडे मागणी तरी किती वेळा करावी़ त्यामुळे तोंड दाबून बुक्याचा मार सहन करण्याची वेळ आल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़
आॅनलाईनच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून हाल आहेत़ वेळेवर वेतन होत नाही़ अत्यावश्यक सेवा असल्याने संपावरही जाता येत नाही. सीईओ, डीएचओ यांना निवेदने दिली़ ब्लॉक लेवलच्या बैठकांवर बहिष्कारही टाकला पण उपयोग झाला नाही़ २५ तारखेपर्यंत ज्यांची बिले येतील त्यांचे तरी वेतन वेळेवर काढावे, एकाबरोबर सर्वांना वेठीस धरणे चुकीचे आहे, वेतन वेळेत न मिळाल्यास खायचे काय? असा उद्विग्न सवाल आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय वासुदेव यांनी केला़

Web Title: Officer Tippashi; Employee hungry ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.