अधिकाऱ्याला पाठविले सुटीवर

By Admin | Updated: May 19, 2015 00:52 IST2015-05-19T00:34:53+5:302015-05-19T00:52:57+5:30

औरंगाबाद : घातक रसायने खाम नदीत टाकलेल्या प्रकरणाच्या कंत्राटाची कागदपत्रे स्टरलाईट कंपनी पोलिसांना देत नाही.

The officer sent the holidays | अधिकाऱ्याला पाठविले सुटीवर

अधिकाऱ्याला पाठविले सुटीवर


औरंगाबाद : घातक रसायने खाम नदीत टाकलेल्या प्रकरणाच्या कंत्राटाची कागदपत्रे स्टरलाईट कंपनी पोलिसांना देत नाही. याशिवाय यासंदर्भातील कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यास कंपनीने पोलिसांसमोर हजर करण्याऐवजी सुटीवर पाठविले. स्टरलाईट कंपनी तपासात असहकार्य करीत असल्याचा युक्तिवाद पोलिसांतर्फे सोमवारी न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर अनिल रत्नपारखी याची पोलीस कोठडी न्यायालयाने एक दिवसाने वाढविली.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे अनिल रत्नपारखी याला पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. अ. खान यांच्यासमोर हजर केले व आरोपीस पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागितली. यासाठी पोलिसांनी असा युक्तिवाद केला की, बालाजी केमिकल कंपनी, (इमरानी, ता. खरगोणी, मध्यप्रदेश) ही कंपनी बंद असताना स्टरलाईट कंपनीत उत्पन्न होणाऱ्या रसायनाची विक्री व वाहतुकीचा करार आशिष जैन व त्याचा भागीदार अनिल परिहार याच्याशी कशाच्या आधारे करण्यात आला, याचा शोध घेण्यात येत आहे. या कराराची कागदपत्रे उपलब्ध असूनही स्टरलाईट कंपनी ते पोलिसांना देण्यास टाळाटाळ करीत आहे. एवढेच नव्हे तर कंपनीचे असोसिएट आॅफिसर राजेंद्र डोईफोडे यांना चौकशीला हजर न करता कंपनीने त्यांना सुटीवर पाठवून चौकशीला असहकार्य केले आहे.
आठ आरोपींना अटक गरजेची
पोलिसांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, सुमित खांबेकर, आगा खान, सोनू चव्हाण, अस्लम कलीम शेख, तुषार पाखरे, चंदन नागेंद्रसिंग या सहा जणांच्या टोळीस यापूर्वीच अटक करण्यात आली असून, कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर यालाही अटक केली आहे. खाम नदीत रसायन सोडण्याप्रकरणात अन्य ८ आरोपींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते आरोपी असे- आर. सी. मेहता (रा. ठाणे), प्रकाश चित्रोड (रा. वापी, गुजरात), आशिष जैन, अनिलसिंग परिहार (रा. मध्यप्रदेश) यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आवश्यक आहे.
खाम नदीत घातक रसायने सोडणे हा नियोजित कट असून, पांढरपेशा आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हजारो मनुष्य, प्राण्यांच्या जिवांशी केलेला हा खेळ आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या आरोपींनी हजारो एकर जमीन नापीक करण्यासह जीवितास हानी पोहोचविल्याचा जोरदार युक्तिवाद पोलिसांनी केला आहे.
कंपनीचा चेन सप्लाय मॅनेजर अनिल रत्नपारखी याला दि. ११ मे रोजी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्याला न्यायालयाने दि. १५ मे व नंतर १९ मेपर्यंत कोठडी वाढवून दिली होती. रत्नपारखी याच्याकडे कंपनीच्या रसायनाची वाहतूक व विक्रीचे कंत्राट देणे, रसायने टँकरमध्ये भरणे, रसायन संबंधित कंपनीत पोहोचले की नाही, याची माहिती घेणे आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रत्नपारखी याच्या कोठडीत वाढ करण्याची पोलिसांची मागणी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रत्नपारखीची कोठडी २० मेपर्यंत वाढविली. सहायक सरकारी वकील व्ही. डी. सपकाळ यांनी यात काम पाहिले.

Web Title: The officer sent the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.