छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यावरून २१ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यामागे खरा सूत्रधार क्रीडा उपसंचालक संजय सबनीस हाच असावा, असा संशय खासदार संदीपान भुमरे यांनी सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराप्रसंगी व्यक्त केला. पालकमंत्री असताना क्रीडा समिती गठीत करण्याबाबत सबनीस यांना वारंवार सूचना केल्या, लेखी पत्रव्यवहार देखील केले. परंतु, त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले होते.
कंत्राटी कर्मचारी घोटाळा करण्याचे धाडस करू शकत नाही. त्यामुळे सबनीस यांच्यावरच जास्तीचा संशय असल्याचे सध्या तरी दिसत आहे. सबनीस येथे कधीच येत नव्हते. ते पुण्यातून काम पाहायचे. कायमस्वरूपी अधिकारी असता, तर हा आर्थिक घोटाळ्याचा प्रकार घडला नसता. अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुख्य सूत्रधार सबनीसच असा संशय आहे. कंत्राटी कर्मचारी हे सगळे करूच शकत नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. चौकशी करून शासनाचा सगळा निधी घोटाळा करणाऱ्याकडून वसूल करावा, असेही खा. भुमरे म्हणाले.