एक अधिकारी अन् चार गावांचे कारभारी
By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:42+5:302020-11-29T04:06:42+5:30
रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करताना कामाचा व्याप विचारात घेतला नसल्याचे पुढे येत आहे. कारण, एका- ...

एक अधिकारी अन् चार गावांचे कारभारी
रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करताना कामाचा व्याप विचारात घेतला नसल्याचे पुढे येत आहे. कारण, एका- एका अधिकाऱ्यांकडे मूळ कामासह चार गावांचा गाडा हाकण्याची जबाबदारी सोपविल्याने संबंधितांची भंबेरी उडत आहे. यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी संबंधितास पंधरा दिवसांतून केवळ एकादा दिवसच काम करण्याची संधी मिळते. या प्रकारामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
फुलंब्री तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींचा कालावधी संपल्याने त्याठिकाणी प्रशासकाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, या नेमणुकादरम्यान अनागोंदी झाली आहे. काही अधिकाऱ्यांकडे तब्बल पाच ठिकाणचा कारभार असल्याने कुठे काय करावे, या संभ्रमात ते आहेत. नेमणुका करताना संबंधित अधिकारी कसा आपल्या कर्तव्यास प्राधान्य देईल, याचा कुठलाच विचार केला नसल्याने अडचणी येत आहेत. जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गटातील ग्रामपंचायतीवर प्रशासकाच्या नेमणुका केल्या होत्या. त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक गावांचा कारभार देण्यात आल्याने सर्वच ठिकाणी नियमित जाणे शक्य होत नसल्याचे प्रशासकांचे म्हणणे आहे. फुलंब्री तालुक्यातील २३ केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना विविध ग्रामपंचायतींचे प्रशासक बनविण्यात आले आहे, पण २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्याने शाळेच्या कामात अनेकांना ग्रामपंचायतींकडे जाण्यासाठी वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.
----- व्यापामुळे कामे रखडली ------
पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एस. एम. शेंगुळे यांना पंचायत समितीत कृषी विभागाच्या कामांसह तालुक्यातील बोधेगाव बु, किनगाव, धानोरा, हिवरा अशा चार ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. ए. जायभाय यांच्याकडे चिंचोली नकीब, तळेगाव, सांजूळ, पाल या चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. शेंगुळे, जायभाय यांच्यासह इतरांवरसुद्धा असाच भार देण्यात आल्याने बहुतांश ठिकाणीची कामे रखडली आहेत.